कोरोनाने वाढविला ‘ताप’! २५ ते ५५ वर्षे वयोगटाची बिनधास्त भटकंती; नाकाखालील‌ मास्क धोकादायक

नाशिक : कोरोना वाढतोय, सावधान..! एकीकडे चाचण्या वाढल्याने रुग्णसंख्येत वाढ झाल्याची भलावण केली होती. पण पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत खासगी आणि सरकारी प्रयोगशाळांमधील ‘पॉझिटिव्ह’ रुग्णसंख्येतील भल्या मोठ्या तफावतीचे चित्र पुढे आले. सरकारी प्रयोगशाळांमध्ये ८ ते ९ टक्के, तर खासगीमध्ये २५ टक्क्यांपर्यंत रुग्ण ‘पॉझिटिव्ह’ आढळताहेत. त्याचा चौकशी अहवाल अद्याप पुढे आला नाही. अशातच, ॲन्टिजेन अथवा स्वॅब चाचणीऐवजी सिटीस्कॅनद्वारे तपासणी करून उपचाराला सुरवात केली जात असली, तरी सिटीस्कॅनची माहिती यंत्रणेपर्यंत पोचत नाही. त्यामुळे नेमकी रुग्णसंख्या किती, याचा ताळमेळ साधला जात नाही. 

रुग्णसंख्यावाढीची कारणे काय आहेत, याचा शोध घेतल्यावर धक्कादायक वास्तव पुढे आले. शहर असो की ग्रामीण भाग आपल्याला उघड्या डोळ्यांनी जे पाहायला मिळते ते म्हणजे, कोरोनाची लस उपलब्ध झाली असून, ती आज ना उद्या आपणाला मिळणार या भावनेतून अनेक जण निर्धास्त झाले आहेत. त्यातून बिनधास्त भटकंती केली जात आहे. नाकाखाली मास्क ठेवून फिरणारे दिसतात. सार्वजनिक कार्यक्रम, धार्मिक आणि पर्यटनस्थळे, विवाह सोहळे अशा ठिकाणी भरगच्च गर्दी होऊ लागली आहे. शारीरिक अंतर, सातत्याने हात साबणाने स्वच्छ धुणे यावर फुली मारण्यात आली आहे. अशातच, मधल्या काळात किमान तापमानाचा पारा १० अंश सेल्सिअसच्या खाली अनेकदा घसरला होता. परिणामी, नव्याने आढळणाऱ्या कोरोना रुग्णांमध्ये २५ ते ५५ वर्षे वयोगटातील नागरिकांचे प्रमाण अधिक आहे. अशा एका विचित्र परिस्थितीत सिटीस्कॅनद्वारे कोरोनाच्या लागणीचा निष्कर्ष काढून केल्या जाणाऱ्या उपचाराची माहिती प्रत्येक दिवसाला उपलब्ध करण्याची व्यवस्था सरकारने केल्यास दिवसाला आणखी १०० रुग्णांची भर पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

हेही वाचा - सिव्हील हॉस्पीटलमधून बालिका अपहरण प्रकरणी अपहरणकर्त्याकडून खुलासा! वेगळेच सत्य समोर

नाशिक, सिन्नर, निफाड ‘हीटलिस्ट’वर 

कोरोनाचा एक रुग्ण किमान दहा जणांना बाधित करतो, असे आरोग्य यंत्रणेच्या निदर्शनास आले आहे. सद्यःस्थितीत कुटुंबामधील लागणचे प्रमाण वाढत चालले आहे. नाशिक शहर आणि ग्रामीणच्या जोडीला सिन्नर आणि निफाड तालुका रुग्णसंख्या वाढीच्या ‘हीटलिस्ट’वर पोचला आहे. ग्रामीण भागात मास्क वापरणे जवळपास बंद झाले आहे. त्याच वेळी शारीरिक अंतर पाळले जात नाही. हात धुण्यासाठी चालढकल केली जात आहे. शहरांमधून वर्दळीच्या ठिकाणी हीच स्थिती पाहावयास मिळते. त्यामुळे दिवसाला सर्वसाधारणपणे २०० ते २५० रुग्ण वाढताहेत. गेल्या वर्षी एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात मालेगावमधून दिवसाला शंभर ते दीडशे रुग्ण वाढत चालले असताना दिवसाला २०० ते २५० रुग्ण आढळत होते. सध्याचा रुग्णवाढीचा हाच ‘ट्रेंड’ राहिल्यास येत्या पंधरा दिवसांमध्ये दिवसाला ३०० ते ३५० रुग्णवाढीचा धोका दिसतो आहे. नाशिक शहर आणि जिल्ह्याचा विचार करता, मार्च २०२० पासून आजपर्यंत पाच लाख १९ हजार २९४ स्वॅबची चाचणी झाली आहे. त्यांपैकी एक लाख १८ हजार ३५३ रुग्ण ‘पॉझिटिव्ह’ आढळले. ‘पॉझिटिव्ह’ रुग्णांचे हे प्रमाण २२.७९ टक्के असून, आतापर्यंत दोन हजार ७३ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण १.८ टक्के आहे. दुसरीकडे बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण आतापर्यंत ९७.२१ टक्क्यांपर्यंत पोचले आहे. फेब्रुवारीमध्ये गेल्या १६ दिवसांमध्ये स्वॅब चाचणीत १२.५९ टक्के रुग्ण कोरोनाचे ‘पॉझिटिव्ह’ आढळले आहेत. २२ जणांचा मृत्यू झाला असून, बरे होणाऱ्यांचे प्रमाण १०२.४० टक्के झाले आहे. 

लक्षणे नसलेले ७० टक्के रुग्ण 

नाशिक शहर आणि जिल्ह्यात सद्यःस्थितीत कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या एक हजार १९७ इतकी आहे. त्यातील ७० टक्के म्हणजे, ८४४ रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे नाहीत. उरलेल्या ३५३ रुग्णांमध्ये लक्षणे आढळली. त्यातील ५ टक्के म्हणजे, ५२ रुग्णांसाठी व्हेंटिलेटरची व्यवस्था करावी लागली असून, ऑक्सिजनचा उपयोग १७ टक्के म्हणजे, १९७ रुग्णांसाठी केला जात आहे. 

हेही वाचा - अख्खे गाव हळहळले! दोन सख्ख्या बहिणींच्या एकत्रच निघाल्या अंत्ययात्रा; पाच मुलांमधून आता तिघांचाच आधार

कोरोनाची साडेअकरा महिन्यांतील स्थिती 
(नाशिक शहर आणि जिल्ह्यामधील) 
महिना स्वॅब चाचणीमधील ‘पॉझिटिव्ह’ची टक्केवारी मृतांची संख्या बरे होण्याच्या प्रमाणाची टक्केवारी 
‘पॉझिटिव्ह’ रुग्णसंख्या 
मार्च २०२० १ ०.३२ ० ० 
एप्रिल २०२० २८० ११.६५ १२ ४.२९ 
मे २०२० ९२२ १०.३९ ६० ८८.२९ 
जून २०२० २ हजार ९११ २८.९५ १६६ ५२.०१ 
जुलै २०२० १० हजार ३०२ ३१.३१ २६१ ८५.२९ 
ऑगस्ट २०२० २२ हजार ९७० ३०.१० ३७३ ७९.६४ 
सप्टेंबर २०२० ३८ हजार ४९० २८.१८ ४९८ ९६.०५ 
ऑक्टोबर २०२० १७ हजार ७९५ २७.११ ३०० १२१.४७ 
नोव्हेंबर २०२० ७ हजार ४६६ १५.४८ १२१ ११४.५२ 
डिसेंबर २०२० ८ हजार ९८२ १६.१९ १७७ ११०.४७ 
जानेवारी २०२१ ५ हजार ६४५ ९.०६ ८३ १०५.७२ 
फेब्रुवारी २०२१ २ हजार ५३९ १२.५९ २२ १०२.४० 

वयोगटनिहाय रुग्ण आणि मृतांची संख्या 
(मार्च २०२० ते १६ फेब्रुवारी २०२१ पर्यंत) 
वयोगट वर्षांमध्ये ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण झालेले मृत्यू 
पुरुष महिला एकूण पुरुष महिला एकूण 
० ते १२ - ३ हजार ४६१, २ हजार ६६३, ६ हजार १२४ २ ० २ 
१३ ते २५ १० हजार १२७ ६ हजार ९४४ १७ हजार ७१ ८ ११ १९ 
२६ ते ४० २५ हजार ४४४ १३ हजार ६०६ ३९ हजार ५० १०९ ३३ १४२ 
४१ ते ६० २५ हजार ३४३ १४ हजार २९५ ३९ हजार ६३८ ५४६ २१० ७५६ 
६१ च्या पुढे १० हजार २६२ ६ हजार ३६८ १६ हजार ६३० ८१३ ३४२ १ हजार १५५ 
एकूण ७४ हजार ६३७ ४३ हजार ८७६ १ लाख १८ हजार ५१३ १ हजार ४७८ ५९६ २ हजार ७४ 

ग्रामीण भागामध्ये सर्दी, खोकला, ताप अशा रुग्णांवर खासगीत दोन ते तीन दिवस उपचार केले जातात. आजार आटोक्यात येत नाही म्हटल्यावर मग कोरोनाची चाचणी केली जाते. सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढतच आहे. त्यावर उपाय म्हणून खासगी डॉक्टरांशी संवाद साधून रुग्णांची कोरोना चाचणी लगेच करायला सांगितली जावी, ही माहिती दिली जाणार आहे. त्याच वेळी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्येसुद्धा चाचणी तत्काळ करण्यास सांगितले जाणार आहे. सार्वजनिक ठिकाणच्या गर्दीबद्दल सरकारकडून निर्णय घेतला जाईल. 
-डॉ. कपिल आहेर, जिल्हा आरोग्याधिकारी, नाशिक