कोरोनाबळींची संख्या अजूनही नियंत्रणाबाहेर! जिल्ह्यात ३१ जणांचा मृत्यू

नाशिक : जिल्ह्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्‍यूंची संख्या अद्यापही नियंत्रणात आलेली नाही. शनिवारी (ता. १०) दिवसभरात ३१ बाधितांचा कोरोनामुळे बळी गेला असून, यापैकी तिघे चाळिशीच्‍या आतील आहेत. दिवसभरात चार हजार २९४ रुग्‍णांचा अहवाल पॉझिटिव्‍ह आला. बरे झालेल्‍या रुग्‍णांची संख्या तीन हजार ३९१ होती. यातून ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णसंख्येत ८७२ ने वाढ झाली असून, सद्यःस्‍थितीत जिल्ह्यात ३७ हजार १०७ बाधितांवर उपचार सुरू आहेत. 

जिल्ह्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्‍यूंची संख्या चिंताजनक आहे. दिवसभरात झालेल्‍या ३१ मृत्‍यूंपैकी प्रत्‍येकी पंधरा नाशिक शहर व नाशिक ग्रामीणमधील आहेत. तर जिल्‍हाबाहेरील एका बाधिताचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला. नाशिक ग्रामीणमध्ये महापालिका हद्दीलगत असलेल्‍या भगूर, आनंदनगर (देवळाली कॅम्‍प), संसरी आणि बन्नाचाळ (देवळाली कॅम्‍प) अशा ठिकाणच्या चार बाधितांचा, तसेच निफाड तालुक्‍यात तब्‍बल पाच बाधितांचा कोरोनामुळे बळी गेला. तसेच, येवल्‍यात दोन, त्र्यंबकेश्‍वर, सिन्नर, कळवण व नांदगाव तालुक्‍यांत प्रत्‍येकी एका बाधिताचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला. राजापूर (ता. येवला) येथील ३३ वर्षीय, बन्ना चाळ (देवळाली कॅम्‍प) येथील ३१ वर्षीय, तर सिन्नरच्‍या ३८ वर्षीय पुरुष बाधिताचा कोरोनाने मृत्‍यू झाल्‍याची नोंद आहे. शहरातील मृतांमध्ये पंचवटी परिसरातील मृतांची संख्या लक्षणीय आहे. 

हेही वाचा - लग्नाच्या तयारीला लागलेल्या वधू-वरांचा हिरमोड! विसंगत आदेशामुळे 'वेडिंग इंडस्ट्री'त गोंधळ 

दिवसभरात नाशिक शहरातील दोन हजार ८७, नाशिक ग्रामीणमधील दोन हजार २८, मालेगावचे ७७, तर जिल्‍हाबाहेरील १०२ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. बरे झालेल्‍या रुग्‍णांमध्ये नाशिक शहरातील एक हजार ७१६, नाशिक ग्रामीणमधील एक हजार ३२२, मालेगावचे ३०२, तर जिल्‍हाबाहेरील ५१ रुग्‍णांचा समावेश आहे. 
 
तब्‍बल नऊ हजार ६४१ अहवाल प्रलंबित 

प्रलंबित अहवालांच्‍या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून, शनिवारी सायंकाळी उशिरापर्यंत जिल्ह्यात नऊ हजार ६४१ अहवाल प्रलंबित होते. यापैकी नाशिक महापालिका क्षेत्रातील चार हजार ५८०, नाशिक ग्रामीणमधील चार हजार ४४९, तर मालेगावच्‍या ६१२ रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा होती. दिवसभरात जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात चार हजार ६३३ रुग्‍ण दाखल झाले आहेत. यापैकी नाशिक महापालिका क्षेत्रातील चार हजार २११ रुग्‍ण असून, जिल्‍हा रुग्‍णालयात २०, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात २७ रुग्‍ण दाखल झाले. नाशिक ग्रामीणमध्ये ३२२, मालेगावला ५३ रुग्‍ण दाखल झाले आहेत.   

हेही वाचा - अवघे गाव हळहळले; दोन दिवसांपूर्वीच्या लेकीच्या लग्नाच्या मांडवातूनच निघाली पित्याची अंत्ययात्रा