कोरोनाबाधितांच्या घरी जाऊन होणार तपासणी; महापालिकेकडून खास पथकाची निर्मिती 

नाशिक : कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता महापालिका प्रशासन ॲक्शन मोडवर आले असताना नागरिकांकडून हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने आता वैद्यकीय विभागाने बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची घरी जाऊन तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी खास पथकांची निर्मिती केली आहे. 

शहरात कोरोना संसर्गाचा वेग वाढत असून, देशभरातील कोरोना संसर्गित शहरांमध्ये नाशिकचा क्रमांक सातवा आला आहे. त्या मुळे तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने शनिवार व रविवार असे दोन दिवस शहरात अंशतः लॉकडाउन जाहीर केला आहे. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर दिला जात आहे. बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेली लोक तपासणी करण्यास पुढे येत नसल्याने आता वैद्यकीय विभागाने सहा विभागात पथकांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. एका पथकामध्ये पाच व्यक्तींचा समावेश आहे. सिस्टर, लॅब टेक्निशियन, मदतनीस, दोन शिक्षक यांचा पथकात समावेश असेल. पथकाकडून कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कामध्ये कोणत्या व्यक्ती आल्या, त्या व्यक्तींनी कोरोना चाचणी केली की नाही, चाचणी केली नसेल तर घशातील स्राव घेऊन तपासणीसाठी पाठविले जाणार आहेत. 

 हेही वाचा - दुर्दैवी अपघात आणि महापालिका कर्मचाऱ्याचे अख्खे कुटुंब उध्वस्त; ५ वर्षीय चिमुरडा ठार, पत्नी गंभीर 

हातावर क्वारंटाइनचा शिक्का 

कोरोनाबाधित व त्यांच्या संपर्कातील नागरिकांची तपासणी करण्यासाठी पथकाकडून अचानक घरी भेट दिली जाणार आहे. बाधित रुग्ण घरगुती विलगीकरणात स्वतंत्ररीत्या वास्तव्य करत आहे का, त्याच्याकडून अन्य व्यक्तीला संसर्ग होत नाही ना, उपचार योग्यरीतीने सुरू आहे का आदी बाबींची पाहणी केली जाईल. होम आयसोलेशन संदर्भात अडचण असल्यास सरकारी किंवा खासगी रुग्णालयात दाखल केले जाईल. हातावर क्वारंटाइनचा शिक्का मारल्यानंतरही रुग्ण बाहेर फिरताना आढळल्यास गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी माहिती दिली. 

हेही वाचा - नाशिकमधील धक्कादायक घटना! कुटुंबाचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न; पोलीस तपास सुरू