कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू; नातेवाइकांकडून रुग्णालयाची तोडफोड 

नाशिक रोड :  जाब विचारण्यासाठी १० ते १२ नातेवाईक डॉक्टरांच्या  केबिनमध्ये आले. त्यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एकाने रुग्णालयातील काच फोडली.

कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू; नातेवाइकांकडून रुग्णालयाची तोडफोड

खासगी रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नंतर रुग्णाच्या नातेवाइकांनी रुग्णालयात डॉक्टर व मेडिकलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला मारहाण केली. तसेच रुग्णालयाची तोडफोड केली. ही घटना शनिवारी (ता. ३) रात्री येथील दुर्गा उद्यानासमोरील रेडियन्ट प्लस रुग्णालयात घडली. याबाबत उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

नाशिक रोड येथील घटना

याप्रकरणी डॉ. धनंजय शंखपाळ यांनी दिलेल्या तक्रारी म्हटले, की रेडियन्ट रुग्णालयात कोरोना सेंटर आहे. २६ मार्चला सायंकाळी केशराबाई नरहरी सांबारे (वय ६७, अनमोल पार्क, लोखंडे मळा, जेल रोड) यांना नातेवाइकांनी कोविड उपचारासाठी दाखल केले होते. शनिवारी दुपारी चारच्या सुमारास नातेवाइक रुग्णालयात आले. आम्ही रुग्ण केशराबाई यांना दुसरीकडे शिफ्ट करणार आहोत, असे सांगून त्यांनी डिस्चार्ज घेतला. त्यानंतर नातेवाईक केशरबाई यांना नेण्यास आले नाहीत. सायंकाळी साडेसातच्या सुमारास केशरबाई यांची प्रकृती खालावली. त्यांच्या नातेवाइकांना रुग्णालयाने प्रकृती चिंताजनक झाल्याचे कळविले. दरम्यान, रुग्णास अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आली.

उपनगर पोलिसांत गुन्हा 
रात्री पावणेनऊच्या सुमारास उपचार सुरू असताना, केशराबाई यांचा मृत्यू झाला. याबाबत रुग्णालयाकडून त्यांच्या नातेवाइकांना माहिती कळविण्यात आली. त्यानंतर केशराबाईंचे दहा ते १२ नातेवाईक डॉ. शंखपाळ यांच्या केबिनमध्ये आले. त्यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एकाने रुग्णालयातील काच फोडली. मेडिकलमध्ये काम करणारा हर्ष राजेश शेवानी यास झटापटीत हाताला दुखापत होऊन नऊ टाके पडले. 
दरम्यान, या घटनेची माहिती उपनगर पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.