कोरोनामुक्त होताच आमदार ढिकले मैदानात! मेरीसह बिटको रुग्णालयाला भेट

नाशिक : कोरोनामुक्त झाल्यानंतर पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲड. राहुल ढिकले यांनी बिटको रुग्णालय, मेरी कोविड सेंटरला भेट देत रुग्णांची विचारपूस करताना रुग्णालयाला आवश्यक कर्मचारी उपलब्ध करून द्यावे, पुरेसा औषधसाठा उपलब्ध करून द्यावा, रुग्ण व नातेवाइकांची गैरसोय टाळा आदी सूचना महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला केल्या. 

पंधरा दिवसांपासून होम क्वारंटाइन असलेले आमदार ढिकले बरे होऊन मैदानात उतरले. गेल्या वर्षी कोरोनाचा वेग वाढत असताना फुलेनगर, नाशिक रोड भागात त्यांनी कोरोनाबाधितांना सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच तपासणी कामाला गती दिली होती. मार्चमध्ये कोरोना संसर्गाचा वेग वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर पुन्हा ते कामाला लागले होते. मात्र त्यांनादेखील कोरोनाची लागण झाली होती. गुरुवारी निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाल्यानंतर शुक्रवारी (ता.२) त्यांनी नाशिक रोड येथील नवीन बिटको रुग्णालय, पंचवटीतील पंजाबराव देशमुख वसतिगृह सेंटरला भेट देत समस्या जाणून घेतल्या. रुग्ण व नातेवाइकांना दिलासा देताना अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविले. कोरोना प्रादुर्भाव वाढत असून, उपचारासाठी नागरिकांची गैरसोय होता कामा नये, डॉक्टरांनी स्वतःच्या आरोग्याची देखील काळजी घ्यावी. गरज भासल्यास अधिक बेड वाढवावे, औषधसाठा उपलब्ध करावा आदी सूचना केल्या. डॉ. जितेंद्र धनेश्वर, डॉ. पगारे आदींसह वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते. रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासत असून, प्रशासनाने पुरवठा करण्याच्या सूचना दिल्या. 

हेही वाचा - दशक्रिया विधीत अश्रू पुसण्यासाठी धावले 'माकड'! लॉकडाउनमधील दोन घासांची ठेवली कृतज्ञता

कोरोना संसर्ग वाढत असताना नागरिकांना वेळेत उपचार व आवश्यक सुविधा मिळणे गरजेचे आहे. यासाठी बिटको कोरोना रुग्णालय व मेरी कोविड सेंटरला भेट दिली. तेथील रुग्ण व नातेवाइकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. मनपा वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही काही सूचना केल्या आहेत. लसीकरण वाढविण्यावरही भर दिला जाणार असून, त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. 
- ॲड. राहुल ढिकले, आमदार 

हेही वाचा - आंदोलनास बसलेल्या कोरोनाबाधिताचा मृत्यू प्रकरण : दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची पत्नीची मागणी