कोरोनामुळे ऐतिहासिक रंगपंचमीच्या सामन्यांना यंदा ब्रेक! चिमुकल्यांनी मात्र लुटला आनंद  

येवला (जि. नाशिक) : आमने-सामने आलेले १५-२० ट्रक्टर..प्रत्येक ट्रॉलीत रंगाने भरलेले टीप अन् दहा ते पंधरा युवक.. तर मोकळ्या पटांगणातही एकत्रित आलेले हजारो शौकीन येवलेकर..सगळ्यांकडून एकमेकावर होणारी रंगांची उधळण तीही प्रेम व स्नेहपूर्वक...असे जगावेगळे अन् नजरेत साठवून ठेवावे असे चित्र लक्ष वेधून घेते ते रंगपंचमीला होणाऱ्या सामन्यात..! यंदा मात्र टिळक मैदान व डी.जी.रोड सुनासुना होता..कोरोनामुळे सामने रद्द करण्याची वेळ आल्याने समस्त येवलेकरांच्या आनंदावर विरजन पडले आहे.

पुरेसे पाणी असूनही...

१८ व्या शतकापासून येथे हे अनोखे सामने रंगतात, शिलेदार बदलले पण परंपरा मात्र वर्षागणिक दृढ होतांना दिसतेय.रंगपंचमीला सकाळपासूनच सारे शहर रंगात बुडते, याचमुळे शहरात जणू संचारबंदी लागू असल्याचे दृश्य दिवसभर असते. दिवसभर रंगपंचमीची धूम आणि सायंकाळी हजारो येवलेकराच्या उपस्थितीत होणारे सामने हे येथील उत्सव प्रियतेत भर घालत आले  आहेत. यापूर्वी २०१९ मध्ये व त्या अगोदरही दोन-तीन वेळेस पाणीटंचाईमुळे सामने रद्द झाले. यंदा मात्र पुरेसे पाणी असूनही कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सामने रद्द करण्याची वेळ आली आहे.

हेही वाचा - आंदोलनास बसलेल्या कोरोनाबाधिताचा मृत्यू प्रकरण : दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची पत्नीची मागणी

शेकडो वर्ष जपलेली पंरपरा खंडित

दोन दिवसापूर्वी शहर पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्याकडे उत्सव समितीचे माजी नगराध्यक्ष भोलानाथ लोणारी, माजी नगरसेवक संजय कुक्कर, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र लोणारी, राहुल लोणारी समाजसेवक भूषण शिनकर, दीपक भदाणे आदींच्या उपस्थितीत बैठक घेऊन यावर शिक्कामोर्तब झाले होते. आज (ता.४) सकाळ पासून शहरात रंगपंचमीचा कुठेही उत्साह दिसला नाही, अपवाद वगळता काही गल्ल्यांमध्ये युवकांनी रंगपंचमीची धूम केली, मात्र तीही अल्पशा गर्दीतच..त्यामुळे यंदाची रंगपंचमी फक्त बच्चेकंपनीने पुरतीच सिमित राहिल्याचे चित्र दिसले. डी.जी.रोडवर संजय कुक्कर व नागरिकांनी रंगपंचमी ही फक्त रंगाचा टिळा लावून कोरडी साजरी केली. नागरिकांची शेकडो वर्ष जपलेली पंरपरा शहरावर ओढवलेल्या कोरोनाच्या संकटाने या वर्षी कोरडी राहिली.

हेही वाचा - दशक्रिया विधीत अश्रू पुसण्यासाठी धावले 'माकड'! लॉकडाउनमधील दोन घासांची ठेवली कृतज्ञता