कोरोनामुळे प्लेगच्या कटू आठवणी ताज्या! 100 वर्षांपूर्वीच्या महामारीच्या स्फोटाचा पुस्तकात उल्लेख

पिंपळगाव बसवंत (जि.नाशिक) : मनात धडकी भरविणारा कोरोना पुन्हा सर्वत्र हातपाय पसरू लागला आहे. कोरोनाच्या या थैमानाने १९०० मध्ये म्हणजे १२० वर्षांपूर्वी हजारो नागरिकांचे प्राण घेणाऱ्या प्लेग रोगाच्या कटू आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत.

कोरोनामुळे प्लेगच्या कटू आठवणी ताज्या

प्लेगच्या रोगांचे साक्षीदार आता कुणी नाही. पण वडील व आजोबा यांच्याकडून प्लेगच्या मृत्यू तांडवाचे वर्णन व आठवणी आताची वयाची ८० पार केलेले आजोबा-आजी सांगतात. शंभर वर्षांपूर्वी प्लेगने हाहाकार उडवून दिला होता. ही साथ इतकी सांसर्गिक होती की बघता बघता एखाद्याच्या शरीरावर, काखेत गाठ उठायची व उपचार करेपर्यंत त्या रुग्णाची गाठ मृत्यूशी पडायची. मृत्यू झाल्यावर दहनासाठी साहित्याची व्यवस्था नातलगांना करावी लागायची. मृत्यूचे प्रमाण एवढे वाढले होते, की पुरेशी लाकडेही दहनासाठी मिळत नव्हती. एकाचे अंत्यसंस्कार आटोपून घरी परतातच दुसऱ्याला पोचवावे लागायचे, अशी स्थिती होती. त्या वेळी पिंपळगाव शहराची लोकसंख्या अवघी चार हजार असल्याचे सत्यशोधक गणपतराव मोरे यांच्या कार्यावर लिहिलेल्या पुस्तकात नोंद आहे.

हेही वाचा > भुजबळांची बिअर बारमध्ये धाड! बिल न देताच मद्यपींचा पोबारा; दिवसभर चर्चेला उधाण 

नाशिकच्या मविप्रच्या वसतिगृहात त्या वेळी शेकडो मुलांना प्लेग

नाशिकच्या मविप्रच्या वसतिगृहात त्या वेळी शेकडो मुले प्लेग आजाराने मृत्युमुखी पडल्याचा पुस्तकात उल्लेख आहे. नागरिकांनी त्या वेळी या जीवघेण्या आजारापासून बचावासाठी जंगलात, रानावनात वास्तव्याला गेल्याचे सांगितले जाते. शहराच्या बाहेर खुल्या माळावर झोपड्या किंवा तात्पुरत्या वसाहती उभ्या करून लोकांना तेथे सक्तीने राहायला भाग पाडले गेले, जेणेकरून गावात उंदरांमुळे होणारा प्लेगचा प्रादुर्भाव कमी झाला. हे करताना गावातील सर्व व्यापार बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले होते. घर निर्जंतुकीकरणासह विविध उपाययोजनांनंतर ही साथ आटोक्यात आली होती. 

हेही वाचा > दुसऱ्या लाटेत कोरोनाने बालकांना घेरले! हृदय, मेंदूवर आघात होत असल्याची बाब उघड

प्लेगच्या साथीचे आम्ही साक्षीदार नाही पण आजोबा व वडील यांच्याकडून प्लेग साथीचे भयावह स्थितीचे वर्णन ऐकले आहे. प्लेग व मानमोडीने माणूस किड्यामुंग्यांसारखा मरण पावल्याचे ते सांगायचे. कोरोनामुळे त्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या आहेत. 
-ॲड. शांताराम बनकर, पिंपळगाव बसवंत