कोरोनामुळे रिक्षा व्यवसायाला घरघर! चालकांकडून भाजी, फळे विक्री 

मालेगाव कॅम्प (जि.नाशिक) : कोरोनाने छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचे कंबरडे केव्हाच मोडले. वर्षभरात अनेकांच्या मुळावर उठला. छोट्या व्यावसायिकांचे रोजगार बुडाले. आधीच वाढलेली बेरोजगारी त्यात रिक्षा व्यवसाय बरा म्हणत तीन हजारांवर चालकांची रोजीरोटी चालते. अनेक सुशिक्षित बेरोजगार यांनी कर्ज काढून रिक्षाचा व्यवसाय सुरू केला. त्यात लॉकडाउन कर्दनकाळ ठरला. सहा महिने चक्क घरीच. मोकळीक मिळाली तरीही प्रवासातील कोरोनाची भीतीने रिक्षाचालकांची आर्थिक परवड थांबता थांबेना.

रिक्षा व्यवसायाला सोडचिठ्ठी

अनेकांनी भाजीपाला, फळ विक्रीसारखे व्यवसाय सुरू केले. 
मोठ्या प्रमाणात रिक्षाचा व्यवसाय पुन्हा बॅकफूटवर गेला. स्थानिक पतसंस्था, बँका, खासगी फायनान्सकडून उदरनिर्वाहासाठी रिक्षा व्यवसायाची जोड दिली. प्रचंड स्पर्धा असलेल्या या व्यवसायांमध्ये शहरात मोठ्या प्रमाणावर रिक्षा असल्याने वाढत्या पेट्रोलच्या भाववाढीत प्रवास भाडे वाढलेले नाही. पेट्रोलचा दरदिवशी वाढणारा भाव रिक्षा व्यावसायिकांना नाकीनऊ आणत आहे. कोरोनामुळे सोशल डिस्टन्सचा भाग, त्यात दोनच प्रवासी पुढल्या थांब्यावर सोडून तासनतास प्रवाशांची वाट पाहावी लागते. कोरोना काळात तीस टक्के बांधवांनी रिक्षाच्या व्यवसायाला सोडचिठ्ठी दिली. रिक्षा दारासमोर उभी करत इतर कामांकडे वळले आहेत. 

हेही वाचा - नाशिकमधील धक्कादायक घटना! कुटुंबाचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न; पोलीस तपास सुरू

दिवसाकाठी शंभर ते दीडशे रुपये मिळणे मुश्कील
वाढत्या इंधन दरवाढीमुळे ग्रामीण भागातील अनेक मंडळी रिक्षाचा आधार घेत होती. मात्र सर्वत्र वाढलेल्या वाहनांची संख्या पाहता रिक्षात बसायला प्रवासी मिळत नाही. दिवसाकाठी शंभर ते दीडशे रुपये मिळणे मुश्कील झाले आहे. व्यवसाय उभारी घेत असतानाच पुन्हा तो बॅकफूटवर जात आहे. भाड्याने रिक्षा परवड नाहीत. बॅंकेचा हप्ता, मेन्टेनन्स, पेट्रोल दरवाढ सगळेच रिक्षाचालकांच्या मुळावर असल्याचे वैतागून रिक्षाचालक सांगतात. ग्रामीण भागात अनेकांनी ॲपे रिक्षा घेत उदरनिर्वाह चालू केला. त्यांचीही परिस्थिती गंभीर असून, सध्या हंगामी शेतमजूर, कामगार यांची वाहतूक करून कसाबसा रोजगार उपलब्ध होतो. दैनंदिन प्रवाशांची संख्या रोडावल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. 

 हेही वाचा - दुर्दैवी अपघात आणि महापालिका कर्मचाऱ्याचे अख्खे कुटुंब उध्वस्त; ५ वर्षीय चिमुरडा ठार, पत्नी गंभीर 

- शाळा, महाविद्यालय बंद असल्याने परंपरागत प्रवासी घट 
- कोरोनाच्या भीतीने प्रवासी घटल्याचा परिणाम 
- स्वतःची वाहने, दुचाकी मोठ्या प्रमाणावर वाढली 
- वर्षभरात स्कूलच्या बच्चेकंपनीची वर्दी बंद 

कोरोनामुळे अनेक रिक्षाचालकांनी रिक्षा चालविणे बंद केले. अन्य व्यवसायाकडे वळले. पेट्रोलच्या दररोजच्या भाववाढीचा मोठा फटका या व्यवसायाला बसला. प्रमुख थांब्यांवरसुद्धा तासनतास ताटकळावे लागते. 
-मुकुंद पठाडे, रिक्षाचालक, मालेगाव कॅम्प 

 

शहरात मोठ्या प्रमाणावर रिक्षा आहेत. स्वतः रिक्षा असलेल्यांची रोजंदारी मुश्कील असताना मालकाला देऊन काय उरणार, अशी स्थिती निर्माण झाली आहे. लोटगाडी घेऊन फळे विक्रीसह अन्य व्यवसायाकडे रिक्षाचालक वळले आहे. 
-सद्दाम शेख, रिक्षाचालक, जुने बस स्थानक