कोरोनामुळे वाजंत्रींवर उपासमारीची वेळ; दहा जणांच्या मर्यादेत परवानगी देण्याची मागणी 

सिन्नर (जि.नाशिक) : कोरोनामुळे शासनाने लग्नकार्य, सण, उत्सव व मिरवणुकांवर निर्बंध लादल्याने बँजो पार्टी, ब्रास बँड व्यवसाय वर्षभरापासून ठप्प झाला आहे. या व्यवसायात असणाऱ्या पार्टीचालकासह वाजंत्रींवर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने अनलॉक प्रक्रियेतूनही या व्यवसायाला वगळले असल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. व्यवसाय जिवंत ठेवण्यासाठी किमान दहा जणांच्या मर्यादेत व अटी घालून परवानगी द्यावी, अशी मागणी सिन्नर तालुका बँजो पार्टी तथा ब्रास बँड असोसिएशनतर्फे करण्यात आली. 

दहा जणांच्या मर्यादेत परवानगी देण्याची मागणी 
ब्रास बँड संघटनेचे तालुकाध्यक्ष रोहित सरवार यांच्या अध्यक्षतेखाली या संदर्भात झालेल्या बैठकीत तालुक्यातील ब्रास बँड पार्टीचे चालक-मालक व वाजंत्रीवाले उपस्थित होते. सरकारकडून पुन्हा लॉकडाउन करण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे वर्षभर व्यवसाय बंद राहिल्याने कर्जबाजारी झालेल्या बँजो व ब्रास बँडमालकांना पुढील काळातही अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. सामान्यपणे एका बँड पार्टीत किमान २० जणांचा समावेश असतो. हे सर्व वाजंत्री अल्पशिक्षित व गरीब कुटुंबातील असल्याने रोजंदारी करण्याशिवाय त्यांच्याकडे उदरनिर्वाहाचे साधन नाही.

हेही वाचा - आंदोलनास बसलेल्या कोरोनाबाधिताचा मृत्यू प्रकरण : दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची पत्नीची मागणी

वर्षभर व्यवसाय बंद राहिल्याने कर्जबाजारी

वर्षानुवर्षे काम करणाऱ्या या वाजत्रींना मालकांनी वर्षभर कसाबसा आधार दिला आहे. आता गाडीचे हप्ते भरायला पैसे नाहीत, तिथे वाजंत्री म्हणून काम करणाऱ्या कामगारांना सांभाळणे शक्य नसल्याचे सरवार यांनी सांगितले. वारंवार शासनदरबारी, तहसीलदार व संबंधित यंत्रणेला निवेदन देऊनही दखल घेतली जात नसल्याची खंत व्यावसायिकांनी व्यक्त केली. तालुका सरचिटणीस दीपक खरात, मधुकर माळी, योगेश दौंड, राजू पटेल, सोमनाथ मेंगाळ, अन्सार शेख, संतोष उघडे, काळू घेगडमल यांच्यासह बँड पार्टीचालक व वाजंत्रीवाले या वेळी उपस्थित होते. 

हेही वाचा - दशक्रिया विधीत अश्रू पुसण्यासाठी धावले 'माकड'! लॉकडाउनमधील दोन घासांची ठेवली कृतज्ञता

 

आम्हालाही व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी. आमचा प्रपंच याच व्यवसायावर अवलंबून आहे. आमच्याकडे काम करणारे वाजंत्रीवाले आर्थिक हलाखीचा सामना करत आहेत. व्यवसाय सुरू करायला परवानगी दिली तर निम्म्या कामगारांना रोजगार देता येईल. आमच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर हलका होईल. -दीपक खरात, सरचिटणीस, ब्रास बँड असोसिएशन, सिन्नर