कोरोनामुळे ‘वेस्ट टू एनर्जी’ अडचणीत! महापालिका प्रशासनची कबुली; प्रकल्पाला सहकार्य करणार 

नाशिक : संपूर्ण राज्यात पथदर्शी ठरलेला वेस्ट टू एनर्जी प्रकल्प कोरोनामुळे लॉकडाउन जाहीर झाल्याने अडचणीत आल्याची कबुली महापालिका प्रशासनाने दिली. प्रकल्प चालविताना आलेल्या तांत्रिक अडचणी दूर करण्याबरोबरच कंपनीला सहकार्य करण्याचे आश्‍वासन अधीक्षक अभियंता शिवाजी चव्हाणके यांनी दिले. 

जर्मन सरकारच्या जीआयझेड कंपनीच्या सहकार्याने महापालिकेने विल्होळी येथे ३० मेट्रिक टन क्षमतेचा वेस्ट टू एनर्जी प्रकल्प उभारला आहे. प्रकल्पातून प्रतिदिन ३३०० युनिट वीज तयार करण्याचे उद्दिष्ट आहे. मे. ग्रीन ॲन्ड क्लीन प्रा. लि. बंगळुरु व मे. रामकी एनव्हायरो प्रा. लि. कंपनीच्या भागिदारीत प्रकल्प चालविला जात आहे. त्यासाठी मे. विल्होळी वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीम प्रा. लि. नावाने कंपनी स्थापन करण्यात आली. २०१७ पासून प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर आजपावेतो एकदाही प्रतिदिन ३३०० युनिट वीज तयार झाली नाही. त्यामुळे प्रकल्प चालविण्यास कंपनीने असमर्थता दर्शविली आहे, तर महापालिकेकडूनही अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने वेस्ट टू एनर्जी प्रकल्प गुंडाळण्याची तयारी कंपनीने केली असून, यासंदर्भात महापालिकेला नोटीस पाठविली आहे. यासंदर्भात ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर महापालिका प्रशासनाने प्रकल्पाला सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे. 

कोरोनामुळे वेस्टची कमतरता 
मुळात प्रकल्प वेळेत सुरू झाला नाही. २०१८ च्या शेवटी प्रकल्प सुरू झाल्यानंतर वर्षभर प्रकल्प चालला. २०२० मध्ये कोरोनामुळे लॉकडाउन जाहीर झाले. या काळात हॉटेल बंद असल्याने हॉटेल वेस्ट उपलब्ध झाले नाही. आता परिस्थिती पूर्वपदावर आल्याने वीजनिर्मितीसाठी आवश्‍यक हॉटेल वेस्ट उपलब्ध होईल, असे श्री. चव्हाणके यांनी सांगितले. 

हेही वाचा - केवळ दैव बलवत्तर म्हणून बिबट्याच्या हल्ल्यातून वाचले बहिण-भाऊ; साक्षात मृत्यूच्या दाढेतून परतले

 नाचक्की होऊ देणार नाही : सोनवणे 
वेस्ट टू एनर्जी प्रकल्प गुंडाळला जाणार असल्याच्या वृत्तानंतर महापालिकेचे सभागृह नेते सतीश सोनवणे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. जर्मन सरकारने ‘वेस्ट टू एनर्जी’ या प्रकल्पासाठी नाशिकची निवड केली असून, हा प्रकल्प पाहणीसाठी देशभरातूल विविध संस्थेचे प्रतिनिधी येताता. असे असतांना महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे प्रकल्प बंद पडल्यास महापालिकेची नाचक्की होणार होईल. प्रकल्प बंद करण्यासंदर्भात कंपनीने जी करणे दिली आहेत. त्याची शहानिशा करून प्रकल्प निरंतर सुरू राहील याची काळजी घेण्याचे आवाहन केले. त्यासंदर्भात केलेल्या कार्यवाहीचा अहवाल त्वरित सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. 

हेही वाचा - रक्षेसाठी राखी बांधलेले हातच रक्ताने माखलेले! रक्षणकर्ता भाऊच बनला बहिणीसाठी काळ