कोरोनामुळे शाळाबाह्य मुलांची संख्या वाढण्याची भीती; महापालिकेतर्फे शहरात सर्वेक्षण 

नाशिक : कोरोनामुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाइन अभ्यासक्रमाच्या माध्यमातून शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्याची कसरत शिक्षकांसह पालकांना करावी लागत असताना दुसरीकडे महापालिका क्षेत्रात रेल्वे, बसस्थानक, बाजारपेठा, वीटभट्ट्या, दगडखाण, बांधकाम साइट, झोपड्या, फुटपाथ आदी ठिकाणी वास्तव्याला असलेल्या शाळाबाह्य मुलांच्या शिक्षणाचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

त्याअनुषंगाने अशा शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्याची मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे; परंतु शाळाबाह्य मुले आढळून आली तरी त्यांच्या शिक्षणासह वास्तव्याच्या जबाबदारीबाबत अनिश्‍चितता असल्याने पालिकेची मोहीम कागद रंगविण्यापुरती असल्याचे बोलले जात आहे. 

गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने लॉकडाउन जाहीर केला. या काळात ऑनलाइन शिक्षणाला महत्त्व आले होते. शाळांकडून शक्य तितक्या प्रयत्नांनी विद्यार्थ्यांना शिकविले गेले. खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असल्याने ऑनलाइन शिक्षणात अडथळे आले नाहीत. महापालिकेच्या १०२ शाळांमधील २७ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांपैकी 
५० टक्के विद्यार्थी दारिद्र्यरेषेखालील असल्याने ऑनलाइन शिक्षणावर परिणाम झाला. पालिकेकडून पुस्तके पुरविण्यात आल्याने काहींनी ऑफलाइन पद्धतीने धडे गिरविले, मात्र अनेक विद्यार्थ्यांना दोन्ही प्रकारचे शिक्षण न मिळाल्याने विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. दर वर्षी महापालिकेकडून शाळाबाह्य मुलांचा शोध घेतला जातो. यंदा मात्र शाळाबाह्य मुले तर सोडाच पालिकेच्या पटलावरील विद्यार्थ्यांनादेखील शिक्षण देता आले नाही. प्रत्यक्षात शाळाबाह्य असलेली मुले व त्यात शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडलेली मुले या दोहोंची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती निर्माण झाल्याने महापालिकेने शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम सुरू केली आहे. दोन वर्षांपूर्वी शहर व जिल्ह्यात चार हजार ५७५ मुले शाळाबाह्य आढळली होती. शाळाबाह्य मुलांना मुख्य प्रवाहात आणतानाच कोरोनाचे संकट ओढावल्याने शाळाबाह्य मुलांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याने शिक्षण विभागासमोर शिक्षणाचा हक्क व अधिकार कायद्याची अंमलबजावणी करण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. 

हेही वाचा - पोलिसांवर आरोप करत नाशिकमध्ये तरुणाची आत्महत्या; आत्महत्येपूर्वीचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल​

अशी राबविली जाईल मोहीम 

महापालिका हद्दीमध्ये १० मार्चपर्यंत मोहीम राबविली जाणार आहे. महापालिका, केंद्र, वॉर्ड, शाळास्तर समित्यांचे गठन करण्यात आले आहे. शाळाबाह्य मुले शोधण्यासाठी केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व अंगणवाडी मुख्य सेविकांची प्रगणक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सहा ते चौदा वयोगटातील मुलांचा शोध घेतला जाणार आहे. 

हेही वाचा -  'देवमाणूस' कडूनच कुकर्म; महिलेच्या आजारपणाचा घेतला गैरफायदा