कोरोनाविरोधात नांदगावात तहसीलदार रस्त्यावर; दुकान सील करत २२ जणांवर कारवाई 

नांदगाव (नाशिक) : प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे शहरात सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाल्याचा परिणाम म्हणून अचानक शहरात एकाच दिवसात कोरोनाचे तेरा रुग्ण आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. याची दखल घेत बुधवारी (ता. २) थेट तहसीलदारांना रस्त्यावर उतरून कार्यवाही करावी लागली.

डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा

दीपावलीपासून शहरातील सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाल्याचे चित्र नांदगाव शहरात दिसून येत आहे. त्यातच तुळसीच्या लग्नानंतर विवाहाचे मुहूर्त निघू लागल्याने अनेक दुकानांतून खरेदीसाठी झुंबड दिसू लागली आहे. त्यामुळे एकाच दिवसात तेरा रुग्ण आढळल्यानंतर तहसीलदार उदय कुलकर्णी यांनी सतर्कतेचा भाग म्हणून मनमाड-नांदगाव पालिका व तालुक्यातील आरोग्य विभागासह यंत्रणेची आढावा बैठक घेतली.

२२ जणांवर कारवाई

कोरोनाच्या वाढत्या  प्रादुर्भावाला रोखण्यासाठी  उपाययोजनांना चालना दिली. मात्र ज्यांनी म्हणून अशा प्रकारची कार्यवाही करावी अशा पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांची अनुपस्थिती  जाणवली. शासकीय कामासाठी ते  बाहेर असल्याची माहिती पालिकेतून देण्यात आली. दरम्यान, प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी दयानंद जगताप, तहसीलदार उदय कुलकर्णी, पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, पालिका अधिकारी राहुल कुटे  यांच्या नेतृत्वाखालील पथकाने विनामास्क फिरणाऱ्या व सोशल डिस्टन्सिंग न पाळणाऱ्या  नागरिकांवर कारवाई केली. या कारवाईत २२ जणांवर पाच हजार रुपये दंडात्मक कारवाई करत सराफ फाट्यावरील कापड विक्रेत्याच्या दुकानाला सील केले. 

हेही वाचा > क्रूर नियती! तो' एक सेल्फीचा मोह अनावर; अन् माऊली लेकरांपासून दुरावली कायमची

कोरोना नियंत्रणात येत असल्याच्या समजुतीत वावरणाऱ्या नांदगाव शहरात रविवार, सोमवारी सलग कोरोनाचे रुग्ण आढळल्याने यंत्रणा खडबडून जागी झाली. रविवारी (ता. २९) एकाच दिवसात १३ तर बुधवारी (ता. २) पुन्हा नव्याने तीन रुग्ण आढळले आहेत. कारवाईत  राहुल कुटे, अतिश  वालतुले, वैभव चिंचोळे, मोनिका आचारे, रोशनी मोरे, अनिल बुरकूल, नीलेश सपकाळे, अरुण निकम, रामकृष्ण चोपडे, राजू गरुड, सागर खरोटे,  पोलिस कॉन्स्टेबल आदींनी  कारवाईत  भाग घेतला. 

हेही वाचा > नियतीची खेळी! लेकाला जेवण घेऊन माऊली आली शेतात; आणि घरी घडले भलतेच