कोरोना आल्यानंतर रिपोर्ट ‘टीम’ ३७३ दिवस नॉनस्टॉप! घेतली फक्त ३ दिवस सुटी

नाशिक : शहर आणि जिल्ह्यातील कोरोनाविषयक दैनंदिन अहवालाची सुरवात झाली. १७ मार्च २०२० पासून. त्यासाठी जिल्हा रुग्णालयात नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांच्यासह सहा जणांची ‘टीम’ ३७३ दिवस नॉन स्टॉप कार्यरत आहे. विशेष म्हणजे या दिवसांमध्ये जिल्हा रुग्णालयातील अहवालाच्या कक्षातील मनुष्यबळाने आजवर दिवाळीतील लक्ष्मीपूजन, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन अशी तीन दिवस सुटी घेतली आहे. जिल्ह्यात पहिला रुग्ण २७ मार्च २०२० ला आढळला आणि नाशिक, मालेगाव महापालिका, ग्रामीण व जिल्हाबाह्य अशी विभागवार दैनंदिन अहवालाला सुरवात झाली. 

कोरोनाविषयक अहवालाचे ‘नॉन स्टॉप’ ३७३ दिवस 
कोरोनाविरुद्धच्या संघर्षात ग्राउंडवर लढणाऱ्या वॉरिअर्सच्या खांद्याला खांदा लावून जिल्हा रुग्णालयातील कक्षाने अहवालामधील सातत्य राखले आहे. सुरवातीच्या काळात डॉ. स्वप्नील दैवज्ञ, डॉ. अविनाश देवरे, दीपक जाधव यांनी या कक्षात सेवा दिली आहे, तसेच रुग्णसंख्या वाढेपर्यंत डेडिकेटेड कोरोना केअर सेंटरच्या अहवालाचे कामकाज डॉ. राहुल आडपे यांनी पाहिले आहे. आता डॉ. पवार यांच्यासमवेत डॉ. पवन बर्दापूरकर, रवी सावंत, संदीप शेटे, संदीप पाटील, विशाल सोनार कार्यरत आहेत. कक्षातून दैनंदिन अहवाल जारी होताच, प्रसारमाध्यमांच्या जोडीला सोशल मीडियाच्या माध्यमातून तो शहरवासीयांप्रमाणे जिल्हावासीयांपर्यंत पोचत राहिला आहे. त्यामुळे सायंकाळ झाली, की कोरोनाग्रस्त रुग्ण किती, किती जणांवर उपचार सुरू आहेत, मृत्यू किती झाले आहेत इथपासून ते ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरवरील रुग्णांची स्थिती काय आहे, इथपर्यंतची माहिती जनतेपर्यंत पोचत असल्याने जनजागृतीला एक प्रकारचा हातभार लागला आहे.

हेही वाचा - सख्ख्या भावांची एकत्रच अंत्ययात्रा पाहण्याचे आई-बापाचे दुर्देवी नशिब; संपूर्ण गाव सुन्न 

जिल्हा रुग्णालयातील मनुष्यबळाने घेतली फक्त तीन दिवस सुटी 

विशेष म्हणजे, हे सारे कामकाज करत असताना कक्षातील कुणीही आपली माहिती जनतेपर्यंत पोचावी यादृष्टीने प्रयत्न केला नाही. त्यामुळे गुरुवारी थेट कक्षात संपर्क साधून ही माहिती संकलित करण्यात आली. दैनंदिन अहवालासाठी स्वॅब तपासणीची माहिती खासगी आणि सरकारी प्रयोगशाळेतील संकलित केली जाते, तसेच खासगी आणि सरकारी रुग्णालयातील ऑक्सिजन, व्हेंटिलेटरवरील रुग्णांची आकडेवारी मिळविण्यात येते. एवढेच नव्हे, तर कुठल्या प्रयोगशाळेकडे किती स्वॅब चाचणीविना प्रलंबित आहेत, याची माहिती प्रत्येक दिवशी घेतली जाते. 

हेही वाचा - पहिल्‍या दिवशी पॉझिटिव्ह कोरोना रिपोर्ट; दुसऱ्या दिवशी निगेटिव्ह! हा तर जिवासोबत खेळ 

सहा लाख ७० हजार जणांची माहिती संकलित 
खासगी आणि सरकारी प्रयोगशाळांमध्ये होणाऱ्या चाचण्यांचे विश्‍लेषण जिल्हा रुग्णालयातील दैनंदिन अहवाल कक्षात केले जाते. त्यातून पॉझिटिव्ह किती, निगेटिव्ह किती याची माहिती पुढे येते. आतापर्यंत या कक्षाच्या माध्यमातून संकलित करण्यात आलेली सहा लाख ७० हजार जणांची माहिती संकलित झाली आहे.