कोरोना काळात डाळिंबाला ‘अच्छे दिन’! संकटातही भाव टिकून

मालेगाव (जि.नाशिक) : कोरोनामुळे वर्षापासून भाजीपाला व फळपिकांचे भाव कमी-अधिक झाले. विशेषत: लॉकडाउनच्या काळात सर्वच फळपिकांचे भाव कोसळल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. ऐन संकटातही डाळिंबाचे भाव बऱ्यापैकी टिकून आहेत. कोरोनाची भीती व गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे यंदा हस्त बहाराचे उत्पादन काही प्रमाणात कमी झाले. सध्या डाळिंबाला ‘अच्छे दिन’ आले असून, भाव ११० ते १२० रुपयांदरम्यान आहे.

कोरोनाकाळात डाळिंबाला ‘अच्छे दिन’ 

उच्च प्रतीचा डाळिंब दीडशे रुपये किलोपर्यंत विकला जात आहे. 
कसमादेचे वैभव असलेला डाळिंब या भागाला सुबत्ता देऊन गेला आहे. मर व तेल्यारोग कमी झाल्याने उत्पादक पुन्हा डाळिंबाच्या प्रेमात पडले आहेत. तीन वर्षांत नाशिक जिल्ह्यात डाळिंबाचे पाच हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र वाढले. कोरोनाच्या सुरवातीला भाव नसल्याने सर्वच फळपिकांचे नुकसान झाले. तरीही मृग नक्षत्रातील डाळिंब या काळात ४० ते ५० रुपये किलोने विकला गेला. जूननंतर कोरोनाचे नियम शिथिल होत गेल्याने या भागातील डाळिंब देशातील दिल्ली, कोलकता, बनारस, इंदूर, अहमदाबाद, मुंबई, चेन्नई या शहरांमध्ये पोचला. मागणी वाढत गेल्याने भावात सुधारणा होत गेली. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये काही ठिकाणी डाळिंबाने शंभरी गाठली होती. 

हेही वाचा - सोने-चांदीच्या दरात घसरण सुरुच; गेल्या १० महिन्यांत निच्चांकी स्तर

संकटातही भाव टिकून; ऑगस्टनंतर मोठी आवक शक्य 
कसमादेसह जिल्ह्यातील बहुतांश भागात गेल्या वर्षी सरासरीच्या दुपटीने पाऊस झाला. पावसामुळे डाळिंबाचे नुकसान झाले. कोरोनाची भीती कायम असल्याने शेतकऱ्यांनी नियोजन करताना खूपच सावधगिरी बाळगली. हस्त बहार शेतकऱ्यांना फायदेशीर ठरला. सध्या ११० ते १२० रुपये किलोने डाळिंब विकला जात आहे. फेब्रुवारी-मार्चदरम्यान आंबे बहार धरला जातो. त्यादृष्टीने शेतकऱ्यांचे नियोजन सुरू आहे. ऑगस्टनंतर डाळिंब मोठ्या प्रमाणात बाजारात येतील, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. आंबे बहाराचे उत्पन्न वाढणार असले तरी या भागातील दर्जेदार व निर्यातक्षम डाळिंबाची लाली कायम राहण्याची शक्यता असल्याने उत्पादकांच्या आशा उंचावल्या आहेत. 

हेही वाचा - काळजावर ठेवला दगड आणि शेतकऱ्याने उभ्या पिकात सोडली मेंढरे! स्वप्न चक्काचूर

डाळिंबाचे भाव असे : 
- मार्च-एप्रिल २०२० : ४० ते ५० रुपये किलो 
- जून-जुलै २०२० : ६० ते ७० रुपये किलो 
- नोव्हेंबर-डिसेंबर २०२० : ८० ते ९० रुपये किलो 
- जानेवारी-फेब्रुवारी २०२१ : ११० ते १२० रुपये किलो 

गेल्या वर्षी कोरोनामुळे मार्च ते मे या कालावधीत भाव कमी झाले होते. यानंतर भावात सुधारणा होत गेली. ऑगस्ट ते ऑक्टोबर कालावधीत झालेल्या जोरदार पावसामुळे ५० टक्क्यांपेक्षा अधिक बागांचे नुकसान झाले. हस्त बहारातील डाळिंब कमी असल्याने सध्या शंभर रुपयापेक्षा अधिक भाव मिळत आहे. कसमादेतील शेतकरी आंबे बहाराचे मोठ्या प्रमाणावर उत्पन्न घेत आहेत. त्यामुळे आगामी काळातही भाव टिकून राहतील, अशी अपेक्षा आहे. 
- दीपक जाधव, डाळिंब उत्पादक, सातमाने