कोरोना काळात दूरशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित : राज्यपाल 

नाशिक : दुर्गम भागातील, दुर्लक्षित व आर्थिकदृष्ट्या मागास घटकांपर्यंत शिक्षण पोचविण्यासाठी मुक्‍त विद्यापीठामार्फत दूरशिक्षणाचा पर्याय उपलब्‍ध करून दिला होता; परंतु कोविड-१९ महामारीच्‍या काळात दूरशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. महाविद्यालय, विद्यापीठात जाऊन शिक्षण घेण्यास मर्यादा आल्‍याने शिक्षणाची इच्‍छा असलेल्या सधन व चांगल्या स्‍थितीतील विद्यार्थ्यांनाही दूरशिक्षण पद्धतीचा अवलंब करावा लागत आहे, असे प्रतिपादन राज्‍यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी मंगळवारी (ता. २) केले. 

आत्‍मनिर्भर भारत घडविण्याचे स्‍वप्‍न मुक्‍त विद्यापीठाच्‍या माध्यमातून
राज्‍यपाल कोश्‍यारी म्‍हणाले, की नियमित शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्‍या तुलनेत विविध क्षेत्रांत कार्यरत राहून कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळताना मुक्‍त विद्यापीठातून दूरशिक्षण घेणारे विद्यार्थी खऱ्या अर्थाने देशाच्‍या विकासात हातभारदेखील लावत आहेत. आत्‍मनिर्भर भारत घडविण्याचे स्‍वप्‍न मुक्‍त विद्यापीठाच्‍या माध्यमातून पूर्ण होऊ शकते, असा आशावाद त्‍यांनी व्‍यक्‍त केला. 

विद्यापीठाचे अमूल्य योगदान 
राज्‍याच्‍या व देशाच्‍या राजकारणात यशस्‍वी व मोठे नेते मानले गेलेले यशवंतराव चव्‍हाण यांच्‍या नावाने मुक्‍त विद्यापीठाचा कारभार चालतो. कोरोनाच्‍या काळात मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दहा कोटींची मदत करताना विद्यापीठाने साजेशी कामगिरी केलेली आहे. ज्ञानगंगा घरोघरी पोचविताना हे विद्यापीठ अमूल्य योगदान देत असल्‍याचेही त्यांनी नमूद केले. 
 
‘मिक्‍स रिॲलिटी’द्वारे गौरव 
कार्यक्रमात नगरविकास व सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांना पदवी प्रमाणपत्र, राज्‍य शासनात सचिवपदी असलेले अतुल पाटणे यांना पीएच.डी. प्रदान केली गेली. गोंदिया येथील शैलेश चुटे, मुंबईतील सईद रुख्सार फातेमा सईद अहमद, निकेश कुऱ्हाडे यांनाही पदवी प्रदान केली. या सर्वांना मिक्‍स रिॲलिटी या वास्तव-अभासी तंत्रज्ञानाद्वारे कुलगुरू, कुलसचिवांनी सन्मानित केले. ‍दीक्षान्त समारंभात अशा प्रकारच्‍या तंत्रज्ञानाचा वापर करणारे मुक्‍त विद्यापीठ राज्‍यात पहिले ठरले आहे. २०१९ व २०२० या दोन वर्षांत विविध विद्याशाखांतील स्नातकांना पदविका, पदव्युत्तर पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी, एम.फिल., पीएच.डी. प्रदान करण्यात आली. दोन्‍ही वर्षांतील एकूण पदव्यांची संख्या दोन लाख ९३ हजार ८५२ असून, यात पदवीधारक दोन लाख १५ हजार २६९, पदविकाधारक ४२ हजार ६१२, पदव्युत्तर पदवीधारक ३५ हजार ८४९, पदव्युत्तर पदविकाधारक ११४ यांचा समावेश होता. एकूण दोन्ही वर्षेमिळून ५२ स्नातकांना सुवर्णपदकाने सन्मानित केले.  

मुक्‍त विद्यापीठाचा प्रथमच ऑनलाइन दीक्षान्त समारंभ; मिक्‍स रिॲलिटीचाही प्रथमच प्रयोग 
यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठाच्‍या २६ व्‍या दीक्षान्त समारंभात ते बोलत होते. कोविड-१९ च्‍या पार्श्‍वभूमीवर हा समारंभ प्रथमच ऑनलाइन पद्धतीने पार पडला. कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन, कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, परीक्षा नियंत्रक शशिकांत ठाकरे यांच्‍यासह विविध विद्याशाखांचे संचालक उपस्‍थित होते.