कोरोना खर्च, सुविधांवरून महासभेत रणकंदन; नगरसेवकांकडून प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती

मालेगाव ( जि. नाशिक) : जिल्हा आरोग्य यंत्रणा, अन्न, औषध व महापालिका प्रशासन रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा मुबलक साठा असल्याचे सांगत असताना महापालिकेच्या सहारा कोविड केंद्रावर इंजेक्शनचा तुटवडा असल्याचे व स्वत: केंद्राला इंजेक्शन पुरविल्याचे भाजप गटनेते सुनील गायकवाड यांनी कोविड खर्चास मान्यता देण्याच्या प्रश्‍नावर निदर्शनास आणून दिले.

कोरोना खर्च व कोविड केंद्रावरील सुविधा, शहरी, ग्रामीण रुग्ण, यापूर्वी झालेला खर्च, नवीन कोविड केंद्रासह विविध प्रश्‍नांची व आरोपांची नगरसेवकांनी प्रशासनावर सरबत्ती केली. उपायुक्त नितीन कापडणीस यांनी सदस्यांच्या विविध प्रश्‍नांना उत्तरे दिल्यानंतर १४ व्या वित्त आयोगाच्या निधीवरील व्याजाची रक्कम सहा कोटी ७२ लाख रुपये असून, कोविड खर्चासाठी ही रक्कम खर्च करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली. सभागृहात सोमवारी (ता. २२) दुपारी चारला महापौर ताहेरा शेख यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन महासभेला सुरवात झाली. उपमहापौर नीलेश आहेर, कापडणीस, नगरसचिव श्‍याम बुरकुल सभास्थानी होते. कोविड खर्च, संगमेश्‍वरातील प्रस्तावित उद्यानास नाव देणे या दोन विषयांवर जोरदार चर्चा झाली. उर्वरित विषय चर्चेनंतर मंजूर करण्यात आले.

संगमेश्वर येथील वाल्मीकनगर शाळा ८ वर्गखोल्या रेडीरेकनर दराने शिक्षण संस्थेला भाडेतत्त्वावर देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. महापालिकेच्या अन्यत्र असलेल्या सर्व पडीक व दुर्लक्षित शाळांचे प्रस्ताव आणा, अशी सूचना सदस्यांनी केली. बेघरांसाठी सायने बुद्रुक येथे जागा बांधकामासाठी देण्याला मंजुरी देण्यात आली. संगमेश्‍वरातील प्रस्तावित उद्यानास नाव देण्याच्या ठरावावरून गोंधळ झाला. सखाराम घोडके यांनी महात्मा जोतिराव फुले उद्यान नाव देण्याचा प्रस्ताव पाठविला. याउलट याच प्रभागातील नगरसेविका दीपाली वारुळे यांनी संत सावता महाराज उद्यान नाव देण्याचा प्रस्ताव दिल्याचे सांगितल्याने गोंधळ झाला. महापौरांनी उद्यानाचे काम झाल्यानंतर विचार करू, असे सांगून हा प्रस्ताव तहकूब केला. चर्चेत रशीद शेख, सखाराम घोडके, सुनील गायकवाड, नंदकुमार सावंत, मदन गायकवाड, खालीद परवेज, फकिरा शेख, निहाल हाजी, अतिक अहमद, फारुख अमीन आदींनी सहभाग घेतला.

हेही वाचा - दशक्रियाची विधी पडली महागात! वारंवार सांगूनही नियमांची एैशीतैशी; परिसरात खळबळ

कोविड खर्चावरून रामायण

कोविडसाठी महापालिका प्रशासन मोठा खर्च करीत असतानाच रेमडेसिव्हिर इंजेक्शन नाही, असे सांगत श्री. गायकवाड यांनी चर्चेला जागा करून दिली. तोच श्री. कापडणीस यांनी दोन दिवसांपासून तुटवडा असल्याचे सांगितले. त्यावर मी सहाराला एक हजार १५० रुपयांना दोन दिवसांपासून इंजेक्शन पुरवितो आहे, असे सांगताच गोंधळ वाढला. त्यातच मदन गायकवाड यांनी माझा स्वत:चा अहवाल एकदा पॉझिटिव्ह व एकदा निगेटिव्ह आला. हा काय गोंधळ सुरू आहे. तुम्ही लोकांना दारोदार फिरवता. नागरिकांच्या जिवाशी खेळता, असा आरोप केला. विविध प्रश्‍नांवरून सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. मागील चार कोटी थकबाकी देणे असल्याचे श्री. कापडणीस यांनी सांगितल्यानंतर सदस्य शांत झाले. यानंतर १४ व्या वित्त आयोगाच्या निधीवरील व्याजाची रक्कम कोविड खर्चास देण्याचा विषय मंजूर करण्यात आला. ग्रामीण भागातील रुग्ण सामान्य रुग्णालयात उपचार घेत असल्याचे श्री. कापडणीस यांनी सांगितल्यानंतर काहीसा वाद शमला.

हेही वाचा - भय इथले कधी संपणार? नाशिकमध्ये विवाहितेसह चिमुरडीवर अत्याचार; भयंकर प्रकार