कोरोना टेस्टसाठी शिक्षकांची धावाधाव; जिल्हा व महापालिका रुग्णालयात चकरा 

डीजीपीनगर (नाशिक) : राज्यात शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षकांच्या कोरोना चाचण्या करण्याचे शासनाने निर्देश दिले. त्यानुसार शिक्षकांनी शासकीय रुग्णालयात चकरा सुरू केल्या. पण आज पहिल्याच दिवशी अनेक शिक्षकांचा जिल्हा रुग्णालयातून महापालिका रुग्णालय व पुन्हा सामाजिक न्याय भवन अशा चकरा मारण्यात दिवस खर्ची पडला. दरम्यान, शिक्षकांच्या टेस्टींगचे अपेक्षित नियोजन अंतिम टप्प्यात असल्याचे शिक्षण विभागाच्या सूत्रांनी स्पष्ट केले. 

जिल्हा व महापालिका रुग्णालयात चकरा ​

राज्य शासनाच्या निर्देशानुसार सोमवार (ता. २३)पासून मोठ्या गटातील नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याबाबत पालक, विद्यार्थी यांची मानसिकता लक्षात घेऊन शालेय शिक्षण विभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार कोरोना निगेटिव्ह आलेल्या सुरवातीला कमीत कमी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना उपस्थित राहून शाळा सुरू करण्याबाबत जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शाळा सुरू करण्यासंदर्भातील पूर्वतयारी म्हणून मानसिकता विकसित करण्याच्या अनुषंगाने सर्व शिक्षकांची मोफत (आरटीपीसीआर) कोरोना चाचणी करण्याचे ठरले. मात्र त्याविषयी गोंधळ कायम आहे. 

हेही वाचा > मामाने वाचवले पण नियतीने हिरावले! चिमुकल्या जयाची मृत्युशी झुंज अपयशी

नियोजन कुठे? 
शिक्षकांच्या चाचण्या शासकीय आरोग्य केंद्रात करण्याचे नियोजन झाले असले, तरी कुठल्या रुग्णालयात कोणते शिक्षक त्याचे नियोजन मात्र झालेले नाही. त्यामुळे गुरुवारी पहिल्याच दिवशी काही शिक्षकांना चकरा माराव्या लागल्या. जिल्हा रुग्णालयातून महापालिका रुग्णालयात पाठविले गेले. तेथून समाज कल्याण विभागाच्या सामाजिक न्याय भवनात पाठविले गेले मात्र तेथे फार उशिरा प्रतिसाद मिळाला. पन्नासच शिक्षकांचे नियोजन होते. पहिल्याच दिवशी ही अडचण आल्याने शिक्षकांचा प्रश्‍न होता. 

हेही वाचा > मोकाट कुत्र्याच्या तावडीत इवलेसे बिथरलेले पाडस; युवकांनी दिले जीवदान

टप्प्याटप्प्यात टेस्टींग होणार
शहरातील ३०० शाळांतील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे त्या त्या विभागातील शाळांना सोयीचे होईल असे कोरोना चाचणी केंद्र सुरू करण्यात येणार आहे. सुरवातीला सर्वच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाळेत जाणे अनिवार्य नाही. त्यामुळे पहिल्या टप्प्यात बारावी दहावीच्या शिक्षकांचे त्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्वाचे नियोजन होईल. तसेच सर्व शिक्षकांची गर्दी होणे संयुक्तीक नाही त्यामुळे टप्प्याटप्प्यात टेस्टींग होणार आहे. -नितीन उपासनी (प्रशासनाधिकारी महापालिका) 

शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व शिक्षकांच्या कोरोना चाचण्या मोफत करण्यात येणार असून, शिक्षकांनी अधिक गर्दी न करता जिल्हा परिषद आरोग्य विभाग, शहर मनपा प्रशासनाने नेमून दिलेल्या कोरोना चाचणी केंद्रावरच आपली चाचणी करून प्रशासनाला सहकार्य करावे. -मोहन चकोर, अध्यक्ष, एनडीएसटी सोसायटी