नाशिक : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जनसामान्यांनी धास्ती घेतली असून, दुसरीकडे वातावरणातील बदलामुळे सर्दी-पडसे, तापाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली आहे. कोरोनाच्या लक्षणाशी साम्य असल्याने सर्दी-खोकला आला की प्रत्येक जण धास्ती घेऊ लागला आहे. त्यातच सध्या डेंगीची साथ सुरू असल्याने अशा रुग्णांचेही प्रमाण वाढत आहे. पण आपल्याला कोरोना झालाय, डेंगी की केवळ थंडी-तापाची तक्रार आहे, हे बारकाईने समजून घेणे आवश्यक ठरते.
वातावरणात गारठा जाणवू लागल्याने दिवसा तप्त ऊन आणि रात्री थंडी असे मिश्र वातावरण सध्या अनुभवायला मिळते आहे. वातावरणातील या बदलांमुळे व्हायरल आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. व्हायरल आजारांमध्ये सर्दी-खोकला आणि ताप ही सामान्य लक्षणे आहेत. असे असले तरी या लक्षणांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सावधगिरी बाळगणे आवश्यक असले तरी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. यापूर्वी इतकी कोरोना विषाणूची तीव्रता राहिलेली नसल्याने व्यवस्थित व वेळीच घेतलेल्या उपचारांनी कोरोनामुळे होणारा त्रास कमी होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आजारांमधील फरक नेमका कसा ओळखायचा, हे आपण जाणून घेऊ.
हेही वाचा - खेळ कुणाला दैवाचा कळला! लेकराचं तोंड बघायच्या आधीच वडिल देवाला प्रिय; गावात भयाण शांतता
व्हायरल आजारांविषयी...
-वातावरणातील गारव्यामुळे विषाणूंची लागण होण्याची शक्यता निर्माण होते.
-साथरोगांमध्ये सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे आढळून येतात.
-काही रुग्णांमध्ये घसा व अंगदुखी, डोकेदुखी, मळमळ, उलटीची तक्रार असते.
व्हायरलमुळे आजारी पडल्याचे ओळखाल कसे?
-मास्कचा वापर व योग्य ते शारीरिक अंतर पाळलेले असेल तर कोविड संसर्गापासून बचाव होईल.
-तापाची तीव्रता कमी असेल, खोकला सातत्याने येत नसेल, कफ व्हायरल आजाराने होऊ शकतो.
व्हायरल आजार टाळण्यासाठी बचावात्मक उपाय...
-गरम पाण्याचा वापर, शक्यतो ताजे व गरम जेवण घ्यावे.
-सकाळी व रात्रीच्या वेळी उबदार कपड्यांचा वापर करावा.
-सर्दी, घशाचा त्रास जाणवल्यास वाफ घ्यावी.
-आहारात रोगप्रतिकारकशक्ती वाढविणाऱ्या पदार्थांचा समावेश करावा.
हेही वाचा - क्रूर नियती! नातेवाईकांसोबत गणेशचे ते फोटो सेशन ठरले शेवटचे; घटनेने परिसरात हळहळ
कोरोनाची लागण झाल्यावरची प्रमुख लक्षणे...
-चव न लागणे किंवा गंध लक्षात न येण्यासह श्र्वसनास त्रास होणे.
-अंग कसकसणे, अंगदुखी व डोकेदुखी.
-किमान एक दिवसासाठी का होईना ताप येतो.
-खोकला थांबत नाही, नाकही सातत्याने गळते.
कोरोनापासून बचावात्मक उपाय...
-गर्दीत जाणे टाळावे, सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा.
-शारीरिक अंतर ठेवणे आवश्यक. शक्यतो सार्वजनिक ठिकाणांशी संपर्क टाळावा.
-नियमित हात पाण्याने स्वच्छ धुवावेत, आवश्यकता वाटल्यास सॅनिटायझरचा वापर करावा.
-नाक, डोळे, तोंडाला सारखा हात लावू नये.
डेंगीपासून बचाव महत्त्वाचा...
-डेंगीची साथ सुरू असल्याने या आजारापासून बचाव महत्त्वाचा.
-सांधेदुखी, चेहऱ्यावर लालसर रॅशेस येणे, ताप, काही वेळा डोळे दुखतात.
-रात्रीच्या वेळी तापाने अंग फणफणते, काही वेळा हाडे दुखतात.
डेंगी टाळण्यासाठीच्या उपाययोजना...
-घरात व सभोवतालच्या परिसरात डासांची उत्पत्ती होणार नाही
याची खबरदारी घ्यावी.
-डेंगीच्या विशिष्ट प्रकारच्या डासांचा वावर आपल्या सभोवताली
नसल्याची खातरजमा करावी.
-पाणी उघड्या भांड्यात साठवू नये, फ्रीजच्या भांड्यात पाणी साठू देऊ नये.
व्हायरल आजार व डेंगीची लागण झालेल्या रुग्णांचे बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी)मध्ये १० ते १५ टक्क्यांपर्यंत प्रमाण वाढले आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असल्याने या आजारांतील नेमका फरक लक्षात घ्यावा. त्रास जास्त होत असेल तर अंगावर न काढता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोरोना टाळण्यासाठी मास्कचा वापर व शारीरिक अंतर ठेवावे. भीती बाळगण्याची आवश्यकता नाही.
-डॉ. शिरीष देशपांडे, माजी अध्यक्ष, आयएमए, नाशिक