कोरोना नियंत्रणासाठी नाशिक महापालिकेने गंभीर व्हावे; राज्याच्या मुख्य सचिवांचे आदेश

नाशिक : कोरोना नियंत्रणासाठी महापालिका यंत्रणेने गंभीर होण्याची गरज असून, कोरोना नियंत्रणासाठी त्वरित महापालिकेला एक उपजिल्हाधिकारी देण्याचे आदेश राज्याच्या मुख्य सचिवांनी दिले. 

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. रुग्णसंख्येच्या वाढीत राज्यातील अनेक शहरांचा समावेश असून, नाशिकसह जळगाव, धुळ्याचा क्रमांक देशातील प्रमुख शहरांत आहे. नुकत्याच केंद्रीय आरोग्य समितीने केलेल्या पाहणीत या शहरातील त्रुटीवर चिंता व्यक्त करण्यात आली होती. या सगळ्याचा परिणाम आज दिसला. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्याची बैठक घेतली. त्यात, नाशिक शहरातील कोरोना नियंत्रणासाठी रस्त्यावर उतरण्याचे निर्देश मुख्य सचिवांनी दिले. 

हेही वाचा - झटपट श्रीमंतीच्या मोहात तरुणाई गुन्हेगारीकडे! द्राक्षनगरीत फोफावतेय भाईगीरीचे वेड

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीला विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, पोलिस अधीक्षक सचिन पाटील आदींसह विभागातील अधिकारी उपस्थित होते. बैठकीत, कोरोना नियंत्रण करण्यासाठी नाशिक महापालिकेने गंभीर व्हावे महापालिकेला त्वरित एक उपजिल्हाधिकारी उपलब्ध करून द्यावा, असे आदेश आज मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिले. कोरोना नियंत्रणासाठी महापालिकेने कंटेन्मेंट झोन करावेत, पोलिसांनी रस्त्यावर उतरले पाहिजे, अशा सूचना आज देण्यात आल्या. ग्रामीण भागातील कोरोना नियंत्रणासाठी गरज असेल अशा तालुक्यात लॉकडाउन लागू करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. विभागीय आयुक्तांनी वाढत्या रुग्णसंख्येचा आढावा घेत, सूचना दिल्या. 

हेही वाचा - एक विलक्षण प्रेम! बाभळीच्या झाडात अडकलेल्या साथीदारासाठी लांडोराची घालमेल; पाहा VIDEO 

महापालिकेला सूचना 

-नाशिक महापालिकेला उपजिल्हाधिकारी दिला जावा. 
-रुग्ण असलेल्या ठिकाणी कन्टेन्मेंट झोन असावेत. 
-कन्टेन्मेंट झोन असलेल्या भागात पोलिस बंदोबस्त. 
-रस्त्यावर उतरून नाशिक शहरात कामकाज व्हावे.