कोरोना नियंत्रणासाठी पालकमंत्री भुजबळ यांचे खासगी डॉक्टरांना आवाहन

नाशिक : कोरोनाच्या नियंत्रणासाठी प्रशिक्षित डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची वाणवा असून, त्यासाठी खासगी डॉक्टरांच्या संघटनाशी संपर्क साधून आवाहन केले आहे. तसेच जिल्ह्यात अडीच हजार व्हेंटिलेटर बेड असून, त्यासाठी जेमतेम अडीच हजार रेमडेसिव्हिरची गरज असताना आतापर्यंत २८ हजार रेमडेसिव्हिर इंजेक्शनचे वितरण झाले आहे. त्यामुळे रेमडेसिव्हिर जातात कुठे? हा प्रश्न मलाच पडला आहे, असे सांगत स्वतः पालकमंत्री छगन भुजबळच रेमडेसिव्हिरच्या बाबतीत गोंधळलेले होते. 

पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी (ता. १०) कोरोना आढावा बैठक घेतली. त्यानंतर ते बोलत होते. जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्त कैलास जाधव, पोलिस आयुक्त दीपक पांडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी आधिकारी लीना बनसोड, पोलिस उपअधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर आदी उपस्थित होते. बैठकीनंतर भुजबळांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

हेही वाचा - अवघे गाव हळहळले; दोन दिवसांपूर्वीच्या लेकीच्या लग्नाच्या मांडवातूनच निघाली पित्याची अंत्ययात्रा  

रेमडेसिव्हिर गेले कुठे? 
 भुजबळ म्हणाले, की सरसकट सगळ्या रुग्णांना रेमडेसिव्हिर देण्याची गरज नाही. आतापर्यंत २८ हजार रेमडेसिव्हिर इंजेक्शनं आली. मात्र जिल्ह्यात अडीच हजार रुग्ण असे आहेत, की जे व्हेंटिलेटरवर आहेत. केवळ व्हेंटिलेटर बेडवरील रुग्णांना रेमडेसिव्हिर लागतात मग एवढे रेमडेसिव्हिर लोक घेतात का? हे शोधण्याची गरज आहे. मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्याशी मी याविषयी बोललो आहे. तसेच नाशिकला अतिरिक्त रेमडेसिव्हिर इंजेक्शन मिळावे, यासाठी त्यांना सांगितले आहे. 

नऊपट रुग्ण वाढले 
महिनाभरात शहर-जिल्ह्यात नऊपट रुग्ण वाढले आहेत. गेल्या ९ मार्चला चार हजार ४०० कोरोनाबाधित होते. ९ एप्रिलला ३६ हजार २३५ इतकी रुग्णसंख्या वाढली आहे. वाढीव बेडची सोय केली असली तरी आवश्यक डॉक्टर आणि परिचारिकांची कमतरता आहे. त्यासाठी डॉक्टरांच्या इंडियन मेडिकल असोसिएशनशी (आयएमए) चर्चा करून खासगी डॉक्टरांना आवाहन केले आहे. ऑक्सिजन पुरवठ्याची स्थिती चांगली आहे. १५८ टन इतकी ऑक्सिजनची गरज असून, सध्या ६१ टन अतिरिक्त ऑक्सिजन असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

हेही वाचा - लग्नाच्या तयारीला लागलेल्या वधू-वरांचा हिरमोड! विसंगत आदेशामुळे 'वेडिंग इंडस्ट्री'त गोंधळ 

पॉझिटिव्हिटी दर घटतोय 
भुजबळ म्हणाले, की ‘ब्रेक द चेन’ उपक्रमामुळे शहर-जिल्ह्यात कोरोना पॉझटिव्हिटी दर घटत असल्याचे मला अधिकाऱ्यांनी सांगितले. शहरात ३० मार्चला ४१ टक्के, ५ एप्रिलला ३८ टक्के, तर सध्या ९ एप्रिलला ३३ टक्के इतकाच पॉझिटिव्हिटी दर आहे.