कोरोना निर्बंधांमुळे व्यावसायिकांची आर्थिक कोंडी; सातच्या आत घरात निर्णयाने नुकसान

मालेगाव (जि. नाशिक) : शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंध कठोर केले आहेत. यातूनच शनिवार, रविवार सर्व आस्थापना बंद व रोज सायंकाळी सातच्या आत दुकाने, आस्थापनांना बंद करण्याची सक्ती करण्यात येत आहे. वर्षभर कोरोनामुळे व्यवसायाची धूळधाण झाली आहे. निर्बंध शिथिल केल्यानंतरही सातच्या आत घरात निर्णयाने लघु व्यावसायिकांची आर्थिक कोंडी झाली आहे. व्यवसायात ६० टक्के घट झाल्याचे विविध व्यावसायिकांनी सांगितले. 

प्रामुख्याने खाद्यपदार्थ विक्रेते, फेरीवाले, चौपाटी व गर्दीच्या चौकात व्यवसाय करणारे व्यावसायिक यांच्या हा निर्णय मुळावर उठला आहे. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी निर्बंध हवेतच, मात्र दुकाने, आस्थापनांसाठी रात्री आठपर्यंतची मुदत द्यावी, अशी अपेक्षा व्यावसायिकांनी केली. शहरातील पोलिस कवायत मैदानावर सायंकाळी पाचनंतर चौपाटीप्रमाणे खवय्यांची गर्दी होते. उन्हाळ्यात यात भर पडते. या चौपाटीवर शेकडो व्यावसायिकांचा उदरनिर्वाह आहे. बहुसंख्य विक्रेते सायंकाळी पाचनंतर दुकाने थाटतात. दोन तासांतच दुकाने बंद करावी लागत असल्याने व्यावसायाचा जम बसत नाही. कामगारांची मजुरी निघणेही अवघड झाले आहे. त्यातच खाद्यतेलाच्या किमती भडकल्याने खाद्यपदार्थ विक्रीतून निघणाऱ्या नफ्याचे प्रमाण कमी झाले आहे. 
आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने खाद्यपदार्थांचे दर वाढविल्यास व्यवसाय होईल की नाही? ग्राहक अन्यत्र वळतील, या भीतीपोटी आजही शहरात दहा ते पंधरा रुपये प्लेट दरानेच भजी, पाववडा, सॅन्डविच, कचोरी, सामोसा आदी पदार्थांची विक्री होत आहे. पूर्व भागात अद्यापही हे पदार्थ दहा रुपये प्रतिप्लेटप्रमाणेच विक्री होत आहेत.

हेही वाचा - नाशिकमधील धक्कादायक घटना! कुटुंबाचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न; पोलीस तपास सुरू

शहरातील नोकरदार प्रामुख्याने शनिवारी, रविवारी खरेदीसाठी बाहेर पडतात. गेल्या आठवड्यापासून हे दोन दिवस पूर्णतः बंद ठेवण्यात येत आहे. त्याचा व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. त्या मुळे नोकरदार कामावरून घरी परतल्यानंतर सायंकाळी खरेदीसाठी येतात. ग्रामीण भागातील बहुसंख्य नागरिकही दुपारचे जेवण आटोपून दुपारी चारनंतरच खरेदीसाठी शहरात येतात. त्या मुळे मोठ्या आस्थापना, मॉल व दुकानांच्या व्यवसायावरही परिणाम झाला आहे. 

खाद्यपदार्थ विक्रेत्यांचा खरा व्यवसाय सायंकाळी सहा ते रात्री नऊ, यादरम्यान सुरू होतो. दुकान लावण्याची तयारी, साफसफाई, सडा-शिंपण करून कढईतील तेल कडाडते न कडाडते तो २५ ते ५० गिऱ्हाईक होतात. सायंकाळचे सात वाजतात. फास्टफूड गाडीचे दररोजचे शंभर रुपये भाडे व एका मजुराचा पगारही नफ्यात निघत नाही. व्यवसाय ५० टक्के कमी झाला आहे. एक तासाची वेळ वाढवून द्यावी. 
- सोमेश्‍वर लिंगायत, अन्नपूर्णा फास्टफूड, मालेगाव 

 हेही वाचा - दुर्दैवी अपघात आणि महापालिका कर्मचाऱ्याचे अख्खे कुटुंब उध्वस्त; ५ वर्षीय चिमुरडा ठार, पत्नी गंभीर 

आझादनगर भागातून पोलिस कवायत मैदानावरील चौपाटीवर सायकलवर शेकडो खेळणी थाटून विक्रीसाठी येतो. व्यवसायासाठी सहा किलोमीटरची पायपीट करावी लागते. अवघे दोन तास व्यवसाय होतो. त्यातून शंभर-दोनशे रुपये सुटणेही अवघड झाले आहे. चौपाटीवर सायंकाळी सातनंतरच खऱ्या अर्थाने व्यवसाय असतो. एरवीच्या विक्रीपेक्षा २५ टक्केच खेळणी विक्री होत आहे. यातील पाच टक्के खेळणी व फुगे रस्त्याने येता-जाताना विक्री होतात. 
- इस्माईल अन्सारी, खेळणी विक्रेता, मालेगाव