कोरोना निर्बंधाची वर्षपूर्ती : यंत्रमाग सुरू झाल्याने मालेगाव पूर्वपदावर; नागरिकांची बेफिकिरी अद्यापही सुरूच 

मालेगाव (जि.नाशिक) : कोरोना संसर्गाच्या पहिल्या टप्प्यात शहरात कोरोनाचा उद्रेक झाला. आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली होती. संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी राज्यात अन्यत्र लॉकडाउन असतानाही यंत्रमागांचा खडखडाट सुरू झाला अन्‌ शहर पूर्वपदावर आले. शहरवासीयांनी कोरोनाचे शिवधनुष्य हिमतीच्या बळावर पेलले. शहरवासीयांनी जुगाड करून उद्रेक काळात घरीच उपचार सुरू केले. यातून बोध घेऊन राज्य शासनाने तब्बल आठवड्यानंतर होम आयसोलेशनचा आदेश काढला.

अन्य समस्यांनी घेरले

सध्या यंत्रमागाला कोरोनाऐवजी अन्य समस्यांनी घेरले आहे. ८० टक्के यंत्रमाग सुरू असले तरी नफ्याचे प्रमाण नाममात्र आहे. नागरिकांची बेफिकिरी व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. शहरात एक हजार २५७, तर तालुक्यात ४५७ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. शासकीय व खासगी रुग्णालयात रेमडेसिव्हिरचा तुटवडा भासत असल्याने चिंता वाढली असून, सोयी-सुविधा, स्वच्छतेच्या नावाने ओरड होत आहे. 

कोरोना निर्बंधाची वर्षपूर्ती- यंत्रमाग 
शहराचे अर्थकारण यंत्रमागावर अवलंबून आहे. कामगार कामात गुंतला तर कोरोनाची भीती दूर होईल हे ‘सकाळ’ने सातत्याने निदर्शनास आणून दिले. शासनाने येथे कोरोना काळात स्थानिक अधिकाऱ्यांच्या मदतीला डॉ. पंकज आशिया व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांना येथे विशेष नियुक्तीवर पाठविले. स्थानिक समाजघटकांच्या संबंधितांनी बैठका घेऊन यंत्रमाग सुरू होण्यासाठी प्रयत्न केले. शासन व जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी संमती दिल्यानंतर यंत्रमाग सुरू झाले अन्‌ जणू काही शहरातून कोरोना गायब झाला. शहरवासीयांचे मनोबल यासाठी महत्त्वपूर्ण ठरले. महापालिका, महसूल व पोलिस प्रशासनाने या काळात केलेले काम उल्लेखनीय होते. 

नागरिकांची बेफिकिरी, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रुग्णसंख्येत वाढ 
एप्रिल, मे या दोन महिन्यांच्या कार्यकाळात शहरात सर्वत्र दफनविधीसाठीचे जनाजे दिसत होते. यातून शहरात दहशत निर्माण झाली होती. पहिल्या टप्प्यातील लॉकडाउनमुळे अर्थकारण बिघडले. महापालिका व आरोग्य विभागावर ताण आला. रुग्ण शोधमोहिम, चाचणी, तपासणी, रुग्णांवर उपचार, कोविड केअर केंद्रातील सोयी-सुविधा, बाहेरगावाहून आलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची निवास व भोजनाची व्यवस्था या सर्व बाबींसह आरोग्य यंत्रणेला कोरोना उपचारही नवीनच होते. कृषिमंत्री दादा भुसे, महापौर ताहेरा शेख आदींसह नगरसेवक व दानशूरांनी या काळात सामान्यांना मोलाची मदत केली. दुसऱ्या टप्प्यात रुग्णसंख्या झपाट्याने कमी होतानाच शहराची कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली. यातूनच राज्यात सर्वत्र मालेगाव पॅटर्न चर्चेत आला. या काळात येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना ॲलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद, युनानी या चारही पॅथींचे डॉक्टर, महापालिकेचे कामगार, कर्मचारी, आशासेविका या सर्वांनी प्रामाणिक काम करून मोलाची साथ दिली. प्रशासनाच्या कोरोना काळातील खर्चावरून वाद-विवादही झाले.

 

तरीदेखील राज्यातील अन्य शहरांनीही भीती दूर सारून मालेगावचा आदर्श घेतला. प्रतिकूल परिस्थितीत व सोयी-सुविधांचा अभाव असताना प्रशासनाने केलेले काम उल्लेखनीय होते. शहरातील आरोग्य यंत्रणेला यातून बळकटी मिळाली. महापालिका क्षेत्रात ४०० खाटांची व्यवस्था झाली. आणीबाणीची परिस्थिती उद्‌भवल्यास रुग्णांवरील उपचारासाठी शहरातील शाळा, महाविद्यालये ताब्यात घेऊन कोविड केअर सेंटर सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले. महापालिकेला आरोग्य विभागासाठी कायमस्वरूपी ६८ अधिकारी, कर्मचारी नियुक्तीला मिळालेली मान्यता याचेच फलित आहे.

 

याच काळातील भारतीय जैन संघटना व विविध स्वयंसेवी संस्थांनी केलेले काम प्रशासनाला हातभार लावणारे ठरले. सध्या पूर्व भागातील नागरिकांची बेफिकिरी वृत्ती, कोरोना प्रतिबंधक नियमांचे होणारे उल्लंघन, मास्क न लावणे या बाबी रुग्णसंख्यावाढीला चालना देत आहेत. मोहन चित्रपटगृहातील शोचा तमाशा राज्याने पाहिला. यातून हे थिएटर बेमुदत बंद करण्यात आले. प्रशासनाने दुर्लक्ष न करता, कठोर कारवाई न केल्यास लॉकडाउन व कोरोनाचा उद्रेक शहरवासीयांनी ओढवून घेतल्यास नवल वाटावयास नको. पूर्व भागातील कोरोना चाचण्यांची संख्याही कमी आहे. या भागातील लसीकरणास मिळणारा नकार प्रशासनाची डोकेदुखी ठरत आहे. 

प्रशासनाने केलेल्या उपाययोजना 
* यंत्रमाग व्यवसाय सुरू करण्यासाठी पूर्णता सहकार्य 
* दोनशे स्वयंसेवकांची मदत 
* शहरात तात्पुरती तीन कोविड उपचार केंद्रे 
* कंटेन्मेंट झोनमध्ये अन्नधान्याची चोख व्यवस्था 
* कोविड केंद्रात संगीत, मनोरंजन, टीव्ही, योगाची सोय 
* खासगी डॉक्टर्स, मौलानांशी संवाद साधून जनजागृती 
* १५ फीव्हर क्लिनिक सुरू 
* १३ नागरी आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून रुग्णांची तपासणी 
* भायगावी साकारतेय ग्रामीणसाठी स्वतंत्र कोविड उपचार केंद्र