कोरोना निर्बंधाची वर्षपूर्ती : प्रदूषणाचा आलेख घसरणीनंतर पुन्हा पूर्वपदावर! वर्षभरानंतर फिरले निसर्गाचे चित्र

नाशिक : कोरोना विषाणू संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी बरोबर वर्षभरापूर्वी नाशिककर लॉकडाउन चार दिवसांपासून अनुभवत होते. आस्थापना, दुकाने, कारखाने बंद होत असतानाच रस्त्यावरील वर्दळ थांबली होती. त्याचा सकारात्मक परिणाम, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या झालेल्या पाहणीत आढळून आला होता. हवा प्रदूषण निर्देशांकात घट होत असताना नाशिककरांची जीवनदायिनी गोदावरीचा प्रवाह नितळ पाहायला मिळाला. एवढेच नव्हे, तर पक्ष्यांचे थवे नाशिककरांच्या दारापर्यंत पोचले असल्याने किलबिलाट प्रत्येकाला सुखावत होता. वर्षभरानंतर निसर्गाचे चित्र उलटे फिरले असून, प्रदूषणाचा घसरलेला आलेख पुन्हा पूर्वपदावर धडकला आहे. 

प्रदूषणाचा घसरलेला आलेख पुन्हा पूर्वपदावर
नेचर क्लबतर्फे गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पक्षीगणना केली. त्यात संसर्ग काळात किलबिलाट वाढल्याचे दिसून आले होते. गंगापूर रोड, गोदा पार्क, तपोवन, गंगापूर धरण, जुने नाशिक, पांडवलेणी परिसरात पक्ष्यांची संख्या वाढल्याचे निदर्शनास आले. पण त्याचवेळी पाँड हेरॉन पक्ष्यांची संख्याही वाढल्याने त्या वेळी गोदावरीच्या प्रदूषणात भर पडत चालल्याचे विदारक चित्र आढळले होते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने २४ मार्च ते ४ एप्रिल २०२० या कालावधीत केलेल्या नोंदीमध्ये हवा गुणवत्ता निर्देशांक म्हणजेच, क्यूआयमध्ये मोठी घट झाल्याचे आढळून आले होते. क्यूआय ८० च्या आत ५० ते ७५ पर्यंत स्थिरावला होता. गंगापूर रोडवर ही स्थिती पाहायला मिळाली. ३० मार्च २०२० ला क्यूआय ४९ इतका राहिला. ‘पार्टिक्युलेटर मॅटर’मध्ये मोठी घट झाली होती. मेमध्ये हवा, पाणी, ध्वनिप्रदूषणात मोठी घट झाली होती. गोदावरच्या प्रदूषणात मोठी घट झाली होती. गोदावरीत थेट मिसळणाऱ्या रासायनिक आणि सांडपाण्याचे कमी झालेले प्रमाण त्यास कारणीभूत असल्याचे 

दिवाळीत ध्वनी पातळी झाली नाही खाली 
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिवाळीत ११५ ठिकाणी फटाक्यांच्या आवाजाची क्षमता मोजली होती. त्यात नाशिकमध्ये ध्वनी पातळी ८० डेसिबलच्या खाली गेली नसल्याचे आढळले होते. लक्ष्मीपूजनाला सकाळी मध्यवर्ती बसस्थानक परिसरात ८१.९, तर रात्री ८१.७ डेसिबलची नोंद झाली होती. २०१९ मध्ये हेच प्रमाण ८५.५ डेसिबल इतके राहिले होते. शहराच्या इतर भागामध्ये सकाळी आणि रात्रीच्यावेळी गेल्या वर्षीच्या दिवाळीत नोंदवण्यात आलेली ध्वनी पातळी डेसिबलमध्ये अनुक्रमे अशी ः पंचवटी-७८.५-७५.२, दहीपूल-७९.५-७४.९, सिडको-७७.५-७९, बिटको-७९.६-७९. 

हेही वाचा - पहिल्‍या दिवशी पॉझिटिव्ह कोरोना रिपोर्ट; दुसऱ्या दिवशी निगेटिव्ह! हा तर जिवासोबत खेळ  

लॉकडाउनमध्ये निर्सगाची हिरवीकंच नजाकत असलेल्या नाशिकमध्ये आल्हाददायक हवामानाने आरोग्य वर्धनासाठी मदत झाली होती. घराच्या गच्चीत, स्वयंपाकगृहाच्या खिडकीच्या गजांवर पक्ष्यांची भेट नाशिककरांना होऊ लागली होती. त्यातूनच अनेक कुटुंबांमध्ये पक्ष्यांसाठी घरटी साकारली गेली. पक्ष्यांसाठी धान्य-पाण्याची व्यवस्था केली गेली. पक्षीप्रेम त्यातून वृद्धिंगत झाले. पण हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले तसे नाशिकच्या प्रदूषणात भर पडत चालली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोंदीमधून ते अधोरेखित होत आहे. 

हेही वाचा - सख्ख्या भावांची एकत्रच अंत्ययात्रा पाहण्याचे आई-बापाचे दुर्देवी नशिब; संपूर्ण गाव सुन्न 

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोंदी 
(पाच ठिकाणचे मापन. आकडेवारी पीपीएम मध्ये) 

महिना किमान अधित्तम सरासरी 
मार्च २०२० १४ ८६ ३७ 
एप्रिल २०२० २८ ४३ ३६.५० 
मे २०२० ३३ ५२ ४२.२३ 
जून २०२० १९ ३५ २४.८५ 
जुलै २०२० १४ २७ २० 
ऑगस्ट २०२० १७ २६ २१ 
सप्टेंबर २०२० ३५ ५२ ४३ 
ऑक्टोबर २०२० ३२ ४९ ४०.५२ 
नोव्हेंबर २०२० ३६ ५४ ४३.९२ 
डिसेंबर २०२० २६ ८६ ४६.६७ 
जानेवारी २०२१ २९ ५२ ४०.४२ 
फेब्रुवारी २०२१ ३६ ५० ४२.१७ 
मार्च २०२१ २९ ५० ४१.२३