कोरोना निर्बंधाची वर्षापूर्ती : दातृत्वाच्या हाताने दिला कामगार, बेघरांना दिलासा! 

नाशिक : कोरोनाने नाशिकच्या दारावर थाप मारली असतानाच केंद्र व राज्य शासनाने संपूर्ण देशभर लॉकडाउन जाहीर करत कोरोना साखळी तोडण्यासाठी कंबर कसली; परंतु हा लॉकडाउन दिवसामागे दिवस वाढतच असल्याने हजारो कामगार, बेघरांच्या पोटापाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला. एकीकडे नैसर्गिक आपत्तीने तोंडचा घास हिरावला असतानाच दुसरीकडे दातृत्वाचे हजारो हात पुढे आले. कोणी अन्नधान्याची व्यवस्था केली, तर कोणी कपडे, अनेकांनी रोजच्या वापरात येणाऱ्या वस्तू देय करून मानवी दयाळूपणाच्या स्वभावाचे दर्शन घडविले. 

मानवी दयाळूपणाच्या स्वभावाचे दर्शन

२९ मार्चला ग्रामीण, तर ६ एप्रिलला शहरात पहिला कोरोनाचा रुग्ण आढळला. नाशिकमध्ये थोडासा विलंबानेच कोरोनाने शिरकाव केला असला तरी त्यानंतर संसर्गाच्या वाढलेल्या वेगाने मागचे रेकॉर्ड ब्रेक केले. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सरकारी इलाज सुरू झाला. तो इलाज रोगापेक्षा भयंकर ठरला. लॉकडाउनमुळे अर्थव्यवस्थेचा आलेख शून्यावर आला. प्रत्येकाला रोजगारापेक्षा जीव महत्त्वाचा वाटू लागल्यानंतर खऱ्या अर्थाने जगण्याची लढाई सुरू झाली. पैसा असो की अन्नधान्य ज्यांच्याकडे तो साठविण्याची क्षमता होती, त्यांचा प्रश्‍नच नव्हता. खरा प्रश्‍न होता तो रस्त्यावर राहणारे, नाशिक सोडून मूळगावी परतणारे कामगार, मुंबईहून महामार्ग किंवा मिळेल त्या वाहनाने पोचणारे बेघर यांचा. त्यांच्या मदतीसाठी नाशिकमधून हजारो हात पुढे आले. समाजकल्याण, मेरी कोविड सेंटरमध्ये अन्नधान्य, रोजच्या वापरातील वस्तू जसे साबण, टुथब्रश, चपला आदींचा पुरवठा झाला. महामार्गावर अन्नछत्र उभारले गेले. शक्य होईल तितके अन्न पुरविले गेले. गंगाघाट, मजूर बाजारात अक्षरश: लोळण घेत असलेल्या नागरिकांना कपडे, अन्नधान्याच्या रूपाने मदतीचा हात पुढे केला गेला. अशांची नोंद पालिकेच्या दप्तरी नोंदविण्यात आली. 

हेही वाचा > भुजबळांची बिअर बारमध्ये धाड! बिल न देताच मद्यपींचा पोबारा; दिवसभर चर्चेला उधाण 

या संस्था, व्यक्तींनी दिला मदतीचा हात 
महिंद्र ॲन्ड महिंद्र, नाशिक केटरिंग, स्वराज्य फाउंडेशन, गोविंद फाउंडेशन, युवा आदर्श मल्टिपर्पज, पुरोहित महासंघ, श्रीजी अन्नछत्र, तपोवन मित्रमंडळ, नागचौक मित्रमंडळ, ओमसाई पदयात्रा मित्रमंडळ, कौशल्य फाउंडेशन, स्वामी समर्थ केंद्र, धर्मध्वज सांस्कृतिक मित्रमंडळ, महाले गॅस एजन्सी, श्री दिगंबर जैन तीर्थक्षेत्र गजपंथ, सीएट कंपनी, सुखसागर हॉटेल, जैन ॲलर्ट ग्रुप, गोविंदा फाउंडेशन, स्टेफ फाउंडेशन, वासन टोयोटा ट्रस्ट, सावन क्रियाल रुहानी मिशन, सातपूर राजस्थानी संघटना, जयोऽस्तुते अभिनव फाउंडेशन, सकल जैन संघ, युअर पीपल वेल्फेअर सोसायटी, जगन्नात सेवा मंडळ, झेप सामाजिक संस्था, आई सप्तशृंगी मित्रमंडळ, तुळसी आय हॉस्पिटल, रोटरी क्लब नाशिक. हितेश पाटील, फैजल शेख, तुकाराम घोडेकर, अशोक पंजाबी, जयंत अग्निहोत्री, दीपक मुलतानी.  

हेही वाचा > दुसऱ्या लाटेत कोरोनाने बालकांना घेरले! हृदय, मेंदूवर आघात होत असल्याची बाब उघड