कोरोना प्रादुर्भावाला मनपा प्रशासन जबाबदार; नगरसेवकांचा आरोप 

नाशिक : कोरोना संसर्गाचा वेग वाढला असताना, वेळेत कोविड सेंटर न उभारणे, रुग्णालयांमध्ये मनुष्यबळ न पुरविणे, ऑक्सिजन, बेड उपलब्ध करून न देणे, रॅपिड ॲन्टिजेन, आरटीपीसीआर चाचणी मोहीम न राबविणे व कोरोना रुग्ण ज्या भागात आढळून आले त्या भागात जंतुनाशक फवारणी केली जात नसल्याने शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढल्याचा आरोप नगरसेवकांनी करून प्रशासनावर जबाबदारी ढकलली.

स्थायी समितीच्या सभेत नगरसेवकांचा आरोप 

दरम्यान, वाढत्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पायाभूत सुविधांच्या पाहणीसाठी स्थायी समिती सभापती गणेश गिते नवीन बिटको रुग्णालयात दौरा करणार आहेत. स्थायी समितीची ऑनलाइन सभा सभापती गणेश गिते यांच्या अध्यक्षतेखाली झाली. प्रारंभी समिती सदस्य राहुल दिवे यांनी नाशिक रोडच्या बिटको रुग्णालयाची स्थिती कथन केली. बिटको रुग्णालयात तंत्रज्ञ नसल्याने व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांचा मृत्युदर १०० टक्क्यांपर्यंत पोचल्याचा आरोप त्यांनी केला. कोरोनाबाधित राहत असलेल्या परिसरात जंतुनाशक फवारणी केली जात नसल्याने कोरोना संसर्ग वाढल्याचा आरोप सुधाकर बडगुजर यांनी केला. वैद्यकीय अधीक्षकपदासाठी डॉ. बापूसाहेब नागरगोजे कार्यक्षम नसताना त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली. महापालिकेत निवासी आरोग्य अधिकाऱ्यांची दोन्ही पदे रिक्त आहेत.

 मोहिमेत लोकप्रतिनिधींना सहभागी करून घेण्याची मागणी

वैद्यकीय अधिकाऱ्यांची ५३ पदे रिक्त आहेत. मानधनावरील वैद्यकीय अधिकाऱ्यांना अद्यापही मुदतवाढ देण्यात आली नसल्याची माहिती  बडगुजर यांनी दिली. सलीम शेख यांनी कोरोना नियंत्रण मोहिमेत लोकप्रतिनिधींना सहभागी करून घेण्याची मागणी केली. योगेश हिरे यांनी गंगापूर रोडवरील आकाशवाणी टॉवरजवळील भाजी बाजार कोरोना प्रादुर्भावाला निमंत्रण देणारा ठरत असल्याचा आरोप केला. समिना मेमन यांनी नाशिककरांना आरोग्य सुविधा पुरविण्यात अपयश आले असताना, नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचा अधिकार नसल्याचे सांगितले. 

सातपूर, सिडकोत कोविड सेंटर 
सिडको परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्ग वाढत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे संभाजी स्टेडियममध्ये कोविड सेंटर उभारावे. तसेच प्रभागनिहाय लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी मुकेश शहाणे यांनी केली. प्रतिभा पवार यांनी सिडकोत कोविड सेंटरची मागणी केली, तर माधुरी बोलकर यांनी सातपूर विभागात कोविड सेंटरची मागणी केली. दरम्यान, सभापती गिते बुधवारी (ता. ३१) रुग्णालयातील सुविधांची पाहणी करणार असून, वाढत्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिका रुग्णालयात एमडी फिजिशियनच्या भरतीच्या सूचना त्यांनी दिल्या. शहरात कोविड सेंटर उभारण्यासाठी जागांची पाहणी करण्याच्या सूचना दिल्या.