कोरोना महामारीची भीती, पण डेंगी, मलेरियाने काढला पळ! 

पिंपळगाव बसवंत (जि.नाशिक) : वर्षभरापासून ठाण मांडून बसलेल्या कोरोनाने पुन्हा हातपाय पसरायला सुरवात केली आहे. मात्र, कोविड महामारीत नाशिक जिल्ह्यात डेंगी, मलेरियाच्या डासांनी पळ काढल्याचे रुग्णांच्या कमालीच्या घटलेल्या संख्येवरून समोर आले आहे.

कोरोनाच्या भीतीने डेंगी, मलेरियाचा पळ 

गेल्या वर्षी २०२० मध्ये नाशिक जिल्ह्यात डेंगीचे ३६७, तर मलेरियाचे २ रुग्ण आढळले आहेत. शिवाय २०२१ च्या जानेवारी आणि फेब्रुवारीत आतापर्यंत एकच डेंगी व मलेरियाचे रुग्ण सापडले आहेत. मागील चार वर्षांची आकडेवारी पाहता रुग्णसंख्या चारपट कमी झाली आहे. किटकजन्य आजारांनी पळ काढल्याचे चित्र आहे. त्यामुळे आरोग्य सेवेवरचा ताण हलका झाला असून, कोरोना काळात हा मोठा दिलासा म्हणावा लागेल. 

हेही वाचा - अवघ्या चारच दिवसांवर बहिणीचं लग्न अन् लग्नघरातूनच निघाली अंत्ययात्रा; दुर्दैवी घटना

रुग्णसंख्येत लक्षणीय घट 
पावासाचा जोर कमी होताच डेंगी, मलेरियासह इतर आजारांची डोकेदुखी सुरू होते. त्यामध्ये अनेकांचा बळीही जातो. मात्र, दर वर्षी येणारी ही साथ कोरोना महामारीत थोपविण्यात जिल्हा हिवताप विभागाला यश आले आहे. एकीकडे कोरोनाशी दोन हात करताना जिल्ह्यातील दोन हजार आरोग्य कर्मचाऱ्यांनी माझे कुटुंब, माझी जबाबदारीसह विविध सर्वेक्षण करून कसोटीला उतरले. यात ताप, सर्दी, खोकला यांसह मलेरिया, डेंगी या आजाराचा सर्व्हे झाला. अळीसदृश्‍य भांडी रिकामी करणे, डास उत्पत्ती स्थानावर अळीनाशक औषधे, डास आढळलेल्या ठिकाणी फवारणी करण्यात आली. परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. मोहिमेला नाशिक जिल्ह्यातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. स्वच्छतेकडे लक्ष दिले गेले. त्या मुळे गेल्या वर्षी डेंगी-मलेरिया डासांचा डंख कमी होऊन आजाराला आळा बसला. त्यामुळे नागरिकांच्या खर्चाची बचत झाली. 

हेही वाचा - ५० फूट खोल विहीर, आत ७३ वर्षांच्या आजी; दैवच बलवत्तर दुसरे काय! 

आरोग्य कर्मचाऱ्यांची सतर्कता 
हिवताप, डेंगी रोखण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील आरोग्यसेवक नेहमीच सर्तक असतात. साचलेल्या पाण्याच्या डबक्यात गप्पी मासे सोडणे, आठवड्यातील एक दिवस कोरडा ठेवण्याबाबत जनजागृती असे प्रबोधन केले जाते. त्यामुळे डासांच्या उत्पत्तीला आळा बसला आहे. तापाचा रुग्ण आढळल्यास त्याचा रक्तनुमना घेतला जातो. किटकजन्य आजाराला पायबंद घालण्यात आरोग्यसेवकांनी महत्त्वाची भूमिका निभावली आहे. 

 

चार वर्षांत रुग्णांची संख्या पाहता डेंगी-मलेरियाच्या आजाराला आळा घालण्यात यश आले आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांचा यात सिंहाचा वाटा आहे. गेल्या वर्षी रुग्ण आढळलेल्या गावात यंदा अधिक लक्ष दिले जाणार आहे. -डॉ. माधवराव आहिरे, जिल्हा हिवताप अधिकारी, नाशिक 
---------------- 
किटकजन्य आजाराच्या मुळावर घाव घालण्याचा आम्ही प्रयत्न केला. डास उत्पत्तीची स्थाने नष्ट केली. विविध उपक्रमातून हिवताप व डेंगी प्रतिबंधक सप्ताह साजरा केला. त्यामुळे किटकजन्य आजाराच्या मुसक्या आवळल्या आहेत. -सुनील देवकर, आरोग्यसेवक 

घटता आलेख वर्ष घेतलेले रक्त नमुने हिवतापाचे बाधित रुग्ण 
९ २०१४ २०,५२५ ४०८ 
९ २०१५ २७,६५५ २३१ 
८ २०१६ २३,६६७ १०८ 
७ २०१७ ९१,८४८ ४० 
७ २०१८ ९८,१५१ ९ 
८ २०१९ ३२,४१६ ६ 
६ २०२० ०८,२०८ २