कोरोना रुग्णांची खासगी रुग्णालयांकडून आर्थिक लूट; रुग्णाची पिळवणूक थांबविण्याची मनसेची मागणी

नामपूर (जि . नाशिक)  : कोरोनाच्या  प्रादुर्भावामुळे सर्वच क्षेत्रातील अर्थव्यवस्था ठप्प झाल्याने सर्वसामान्य नागरिकांचं जीणं मुश्किल झालं आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत बागलाण तालुक्यातील काही खासगी रुग्णालयांनी मात्र कोरोनाग्रस्त रुग्णांची पॅकेजच्या गोंडस नावाखाली आर्थिक लूट करण्याची पर्वणी साधली आहे. याबाबत जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांनी लक्ष घालून रुग्णांची पिळवणूक थांबवावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष सतीश विसपुते यांनी निवेदनाद्वारे केली आहे. 

 रुग्णाची पिळवणूक थांबविण्याची मनसेची मागणी 

बागलाण तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. तालुक्यात केवळ सटाणा येथील आदिवासी वसतिगृहात विलीगीकरण कक्ष असून अधिक त्रास होणाऱ्या रुग्णांना डांगसौंदाणे येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार केले जातात. तालुक्याच्या लोकसंख्येच्या दृष्टीने शासकीय आरोग्य सुविधा पुरेशा नाहीत. तसेच खासगी रुग्णालयांवर शासनाचा कोणताही अंकुश नसल्याने सामान्य नागरिकांना लुटण्याची एकही संधी काही खासगी रुग्णालये सोडताना दिसत नाहीत. राज्य सरकारने दर निश्चित केल्यानंतरही त्यातून पळवाटा शोधत सामान्य रुग्णांच्या खिशाला कात्री लावण्याचे प्रकार बागलाण तालुक्यात घडत असल्याचे दिसून येत आहे.

रुग्णांच्या खिशाला कात्री लावण्याचे प्रकार

  तालुक्यातील नामपूर, सटाणा, ताहाराबाद, मुल्हेर, लखमापूर, जायखेडा यांसारख्या मोठ्या गावांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांना कोणत्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे उपचारांची गरज असलेल्या गंभीर रुग्णांना खासगी रुग्णालयांमध्ये जावे लागत असल्याची परिस्थिती आहे. सटाणा शहरातील काही खासगी रुग्णालयांकडून राज्य सरकारच्या बिलांविषयीच्या नियमांतून पळवाट शोधून सामान्य रुग्णांच्या खिशाला कात्री लावण्याचे प्रकार घडत असल्याचे चित्र आहे. 'कोव्हिड'मुळे न्यूमोनियाची लागण झालेल्या; पण ऑक्सिजन पातळी नियंत्रणात असलेल्या रुग्णांना विलगीकरणाची आवश्यकता असते. यासाठी सरकारने चार हजार रुपये दर निश्चित केला आहे. यात सर्व उपचार, रक्त-लघवी तपासणी, एक्स रे व जेवण यांचा समावेश केला आहे. पीपीई किट व रेमडेसिव्हीर यांसारख्या काही महागड्या औषधांचा खर्च मात्र रुग्णांनी करावे असे सरकारचे आदेश आहेत. 

दोन लाखांचे पॅकेज 

बागलाण तालुक्यात कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचारासाठी खासगी रुग्णालयांकडून पॅकेजच्या नावाखाली सरासरी दीड ते दोन लाख रुपये उकळवले जात आहेत. प्रत्यक्षात त्या दर्जाच्या काहीच सुविधा मिळत नाहीत. जेवढी रक्कम आकारली तेवढे बील मिळत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. 
- सतीश विसपुते, तालुकाध्यक्ष मनसे