कोरोना रुग्णाच्या पालकांची आरोग्य कर्मचाऱ्यांना शिवीगाळ; सटाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

कंधाणे (जि. नाशिक) : तिळवण (ता. बागलाण) येथील तरुणाला कोरोनाची लागण झाल्याने आरोग्यसेवक, कर्मचारी त्याला गृहविलगीकरण, संपर्कात आलेल्या कुटुंबातील व्यक्तींची माहिती व कंटेन्मेंट झोन तयार करण्यासाठी घरी गेले असता पालकांकडून पथकातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व दमबाजी करण्यात आली. या प्रकरणी दिलीप आहिरे व सुनंदा आहिरे यांच्याविरुद्ध सटाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

निरपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात तिळवण येथील तरुणाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यावर कोरोना प्रतिबंधक उपाययोजना म्हणून आरोग्य पथकातील कर्मचारी महेंद्र अहिरराव, आरोग्यसेविका सुशीला सावंत व आशा वर्कर्स कर्मचारी रुग्णाला गृहविलगीकरण व संपर्कात आलेल्यांची माहिती घेण्यासाठी घरी गेले. त्या वेळी माझा मुलगा पॉझिटिव्ह नसून तो कामावर गेला आहे. तुम्ही विनाकारण आमच्या घरी येऊन आमची बदनामी करायची नाही, असे सांगून अश्‍लील भाषेत शिवीगाळ केली. आरोग्यसेवक, सेविकांना तुम्ही कशी नोकरी करता आणि आशा वर्कर्स यांना तुम्हाला गावात फिरू देणार नाही, अशी दमबाजी करून माघारी धाडले. त्यामुळे कोरोनाबाधित असूनही कामावर किंवा घराबाहेर फिरून कोरोनाचा संसर्ग पसरविण्यासाठी अप्रत्यक्ष मदत केली म्हणून साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हेही वाचा - ह्रदयद्रावक; वडिलांसह दोन्ही लेकांची अंत्ययात्रा, एकाच वेळी ३ कर्त्या पुरुषांच्या जाण्याने कुटुंबावर शोककळा

सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना आरोग्य कर्मचारी जीव धोक्यात घालून रात्रंदिवस आपली जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांना अशी वागणूक देणे निंदनीय आहे. 
- राहूल सोनवणे, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, निरपूर  

हेही वाचा - अवघे गाव हळहळले; दोन दिवसांपूर्वीच्या लेकीच्या लग्नाच्या मांडवातूनच निघाली पित्याची अंत्ययात्रा