कोरोना रोखण्यासाठी पालिकेला पोलिसांची साथ! दंड वसुलीसह गुन्हे दाखल करण्याचे अधिकार

नाशिक : कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी महापालिका आयुक्त ‘ॲक्शन मोड’मध्ये आली असताना आता जोडीला पोलिसांनादेखील आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार बहाल करण्यात आले आहेत. त्यानुसार पोलिस मैदानात उतरले असून, पालिका-पोलिसांच्या संयुक्त पथकाला विनामास्क फिरताना व्यक्ती आढळल्यास दोनशे रुपये दंड वसुलीचे अधिकार व गुन्हा दाखल करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यानुसार बुधवार (ता.१७)पासून शहरातील वर्दळीच्या ठिकाणी पथकांकडून कारवाईला सुरवात झाली आहे. 

ऑक्टोबर ते जानेवारीत कोरोना नियंत्रणात आला असताना नागरिकांकडून गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क, सॅनिटायझर आणि सुरक्षित वावर या त्रिसूत्रीचा भंग केला गेल्याने कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. यामुळे फेब्रुवारी ते मार्चदरम्यान कोरोनावाढीचा वेग सातपटीने वाढल्याने पालिका प्रशासनाने कारवाईला सुरवात केली. बाजारपेठा, शासकीय कार्यालये, किराणा दुकानदार, फळविक्रेते, भाजी विक्रेते, औषध विक्रेते, हातगाडीवरील विक्रेते, सलूनचालक मास्क घालत नसल्याचे आढळल्याने आयुक्त जाधव यांनी कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी महापालिका व पोलिसांचे संयुक्त पथक कार्यान्वित केले आहे. परंतु, दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार पोलिसांना नसल्याने अडचण निर्माण होत होती. तर पालिकेच्या पथकाला गुन्हे दाखल करण्याचे अधिकार नव्हते. त्यामुळे आयुक्त जाधव यांनी महाराष्ट्र कोविड -१९ उपाययोजना नियम २०२० मधील १० व ११ नुसार विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तींना दोनशे रुपयांच्या दंडासोबतच भारतीय दंड संहिता कलम १८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचा आदेश काढले आहेत. संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करताना कोविड चाचणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

हेही वाचा - रूम नंबर १०५ चे गुढ कायम; मुंबई-नाशिक हायवेवरील हॉटेलमधील घटना

पोलिसांची साथ 

आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाईचे अधिकार बहाल केल्यानंतर पोलिस आयुक्त दीपककुमार पांडे मैदानात उतरले आहेत. पालिकेने सहा विभागांत पथके तैनात केली असून, पथकाच्या जोडीला पोलिसांची साथ मिळाली आहे. गुरुवारी (ता.१८) दिवसभरात साठ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांनादेखील एक हजार रुपयांचा दंड बजावला जात आहे. 

हेही वाचा - सटाण्यात लहान मुले सातच्या आत घरात! रात्रीच्या विचित्र प्रकाराने दहशत; युवकांचा जागता पहारा

मास्क, सॅनिटायजर व सुरक्षित वावर या त्रिसूत्रीचा नागरिकांकडून अवलंब होत नसल्याने कोरोनाचे सुपर स्पेडर ठरत आहे. त्यामुळे विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करताना गुन्हादेखील दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 
- कैलास जाधव, आयुक्त, महापालिका