कोरोना लसाकरणासाठी जिल्हा प्रशासन सज्ज; पहिल्या टप्प्यात ३० हजार कर्मचाऱ्यांना लस 

नाशिक : जिल्ह्यात कोरोना आटोक्यात आला असून, आता लसीकरणाच्या मोहिमेत शासनाच्या आदेशानुसार पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील आरोग्य, पोलिस, गृहरक्षक दलासह ३० हजार कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्याचे नियोजन आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात रोज ६० हजार नागरिकांचे लसीकरण करण्याचे जिल्हा प्रशासनाचे नियोजन आहे, अशी माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली. 

भुजबळ म्हणाले, की गेल्या महिन्यात तीन हजार ४३२ कोरोना रुग्णांची संख्या होती, ती घटून सध्या प्रतिदिन १७० रुग्णसंख्या आहे. जिल्ह्यात कोरोना चार हजार २०९ क्षमतेच्या केंद्रात अवघे ३५० कोरोना रुग्ण आहेत. १ जानेवारीपासून दहा दिवसांत रुग्णांचे प्रमाण एक हजार ७४२ हून एक हजार ७०१ इतके कमी झाले असून, रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ९३ आहे. नव्या स्ट्रेन विषाणूचा आढावा घेतला जात आहे. जिल्ह्यात एकही रुग्ण सापडलेला नाही. कोरोना कक्षाचे राज्याचे सल्लागार डॉ. दीपक म्हैसेकर यांनी नुकतीच नाशिकला पाहणी केली. त्यात त्यांनी काही सूचनाही केल्या. त्यानुसार आगामी काळात ‘ड्राय रन’ उपक्रमातील त्रुटी दूर करण्याचे निर्देश भुजबळ यांनी दिले. 

हेही वाचा > चोरट्यासोबत जेव्हा 'ती' महिलाही चालत्या रेल्वेतून पडली खाली; घटनेने प्रवाशांचा थरकाप

 भुजबळ यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात पाक्षिक कोरोना आढावा बैठकीनंतर ते बोलत होते. जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलिस आयुक्त दीपक पांडे, महापालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी लीना बनसोड, सहाय्यक पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. कपिल आहेर, महापालिका आरोग्याधिकारी बापूसाहेब नागरगोजे, डॉ. आवेश पलोड आदी उपस्थित होते.  तत्पूर्वी जिल्हाधिकारी मांढरे यांनी लसीकरण तयारीची माहिती देताना, पहिल्या टप्प्यात ३० हजार कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचे नियोजन असून, लस साठवणूकीची तिप्पट क्षमता असून, जिल्हा रुग्णालय आणि महापालिकेच्या बिटको रुग्णालयात नवीन लॅब उभारणीसाठी निधी लागणार असल्याचे सांगितले. 

 असे होईल लसीकरण

पहिल्या टप्प्यात २३ केंद्रांवर ३० हजार कर्मचाऱ्यांना लसीकरण 
दुसरा टप्प्यात ६५० केंद्रांवर प्रतिदिन ६० हजार नागरिकांना लस 
सिव्हिल, बिटको नवीन लॅबसाठी निधीचा शासनाला प्रस्ताव 
जिल्ह्यात चार हजार २०९ क्षमतेच्या केंद्रात अवघे ३५० कोरोना रुग्ण  

 

हेही वाचा > रुग्णवाहिकाचालकाने अ‍ॅम्ब्युलन्समध्येच साधली संधी; अपघातग्रस्त रुग्णासोबतच धक्कादायक प्रकार