कोरोना संसर्गामुळे विमानसेवेवर परिणाम; ६० टक्क्यांनी घटली प्रवासीसंख्या

नाशिक : ओझर विमानतळावरून देशभरातील आठ महत्त्वाच्या शहरांमध्ये सुरू झालेल्या विमानसेवेला कोरोना संसर्गामुळे घरघर लागली आहे. गेल्या पंधरा दिवसांत अवघे ४०-४५ टक्के प्रवासी उपलब्ध होत असल्याने विमानसेवेचा हा प्रतिसाद शहर विकासाला घातक ठरणार आहे. अर्थात संपूर्ण देशभरातच ६० टक्क्यांनी प्रवासीसंख्या घटल्याचे उद्योजकांकडून मत व्यक्त केले जात आहे. 

पंधरा दिवसांत ६० टक्क्यांनी प्रवाशांमध्ये घट 
केंद्र सरकारच्या उडान योजनेंतर्गत ओझर येथून विमानसेवेने चांगलेच उड्डाण घेतले. जानेवारी महिन्यात १६ हजार, तर फेब्रुवारी महिन्यात १७ हजार प्रवाशांनी प्रवास केल्याने विमान कंपन्यांनी सेवेचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला. अलायन्स एअर कंपनीतर्फे अहमदाबाद, हैदराबाद, पुणे, स्पाइस जेट कंपनीतर्फे दिल्ली, पुणे, बेंगळुरू, ट्रुजेट कंपनीतर्फे अहमदाबाद, तर स्टार एअरवेज कंपनीतर्फे बेळगाव हवाई सेवा सुरू आहे. आता स्पाइस जेटतर्फे कोलकता, सुरत तसेच अन्य कंपन्यांकडून जोधपूर, जयपूर, सिंधुदुर्ग, बेंगळुरू व चेन्नई अशी हवाई सेवा सुरू केली जाणार आहे. कोलकत्यासाठी सोमवार (ता. २९)पासून विमानसेवा सुरू होणार होती. मात्र कोरोनामुळे देशभर सावधानतेचा इशाऱ्याने प्रवासीसंख्या घटण्यावर त्याचा परिणाम झाला.

हेही वाचा > भुजबळांची बिअर बारमध्ये धाड! बिल न देताच मद्यपींचा पोबारा; दिवसभर चर्चेला उधाण 

जोर ओसरण्याची उद्योजक पाहताएत वाट 

अहमदाबाद, दिल्ली, पुणे, हैदराबाद या शहरांसाठीच्या विमानात अवघे ४०-४५ टक्के प्रवासी आहेत. प्रत्येक विमानतळावर कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. त्याचाही परिणाम प्रवासी कमी होण्यावर दिसून येत आहे. कोरोना संसर्गाचा जोर ओसरण्याची उद्योजक वाट पाहत आहेत.  

हेही वाचा > दुसऱ्या लाटेत कोरोनाने बालकांना घेरले! हृदय, मेंदूवर आघात होत असल्याची बाब उघड