कोरोना संसर्ग वाढीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; शिवसेनेच्या आरोपावर भावनिक राजकारण न करण्याचा आयुक्तांचा सल्ला 

नाशिक : गेल्या महिनाभरात शहरात कोरोना रुग्ण वाढण्याचे प्रमाण चाळीस टक्के असून प्रशासनाने वेळीचं उपाययोजना न केल्याने हि परिस्थिती उदभवल्याचा आरोप शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आयुक्त कैलास जाधव यांना सादर केलेल्या निवेदनात केला आहे. परंतु आयुक्त जाधव यांनी ऑक्सिजन बेड सह कोव्हिड सेंटर व चाचण्या वाढविल्याची माहिती देताना कोरोना लढाईत राजकारण न आणता एकत्र येवून लढण्याचे आवाहन केले. 

शिवसेनेचा निवेदनाद्वारे आरोप
शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे, माजी जिल्हाप्रमुख सुनील बागुल, दत्ता गायकवाड, माजी महापौर विनायक पांडे आदींच्या शिष्टमंडळाने आयुक्त कैलास जाधव यांची भेट घेवून निवेदन दिले. शहरात कोरोनाच उद्रेक वाढला असून गेल्या दिड महिन्यात तीस हजारांहून अधिक कोरोना बाधित आढळून आले. कोरोना बाधितांच्या संख्येत चाळीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. कोरोना मुक्त होण्याचे प्रमाण २५ टक्क्यांनी घटले आहे.

हेही वाचा - दशक्रिया विधीत अश्रू पुसण्यासाठी धावले 'माकड'! लॉकडाउनमधील दोन घासांची ठेवली कृतज्ञता

भावनिक राजकारण न करण्याचा आयुक्तांचा सल्ला 

कोरोना संसर्ग वाढतं असताना प्रशासनाकडून गांभिर्याने घेतले जात नाही. वैदयकीय विभागाकडून हलगर्जीपणा केला जात आहे. बंद केलेले कोव्हिड सेंटर वेळेत सुरु केले नाही, पालिका रुग्णालयांमध्ये पुरेसे मनुष्यबळ नसल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे. कोरोना बाधित रुग्णांना बेड नसल्याचे कारण देत दाखल करून घेतले जात नाही, दाखल रुग्णांना ऑक्सिजन, बायपॅप व व्हेंटिलेटर मिळत नसल्याने मुत्युदरात वाढ होत आहे. शहरात ४,८६५ बेड उपलब्ध असल्याचा प्रशासनाकडून दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात गंभीर परिस्थिती असून रुग्णांना बेड मिळंत नाही. यामुळे महापालिकेची बदनामी होत असल्याचा दावा करण्यात आला. प्रशासनाने ठोस उपाययोजना करून सहा विभागासाठी विशेष वैद्यकीय अधिकारी नेमावे, स्पेशल फोर्स तयार करावा, शासनाकडून वैदयकिय क्षेत्रातील तज्ञांची मागणी करावी आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या. 

हेही वाचा - आंदोलनास बसलेल्या कोरोनाबाधिताचा मृत्यू प्रकरण : दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची पत्नीची मागणी

आकृतीबंध मंजुर व्हावा 
आयुक्त जाधव यांनी बिटको रुग्णालयात तीनशे बेड वाढ वाढून देत असल्याचे सांगितले. कोविड रुग्णालयाची माहिती मिळण्यासाठी जनजागृती केली जाणार असून शहरात पाच लाख माहिती पत्रके वाटप केले जाणार आहे. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड वाढविले जाणार असून सहा विभागासाठी प्रत्येकी एक फिजिशियन नियुक्त केले जाणार असल्याचे शिवसेनेच्या शिष्टमंडळाला माहिती दिली. त्याचबरोबर राज्यात शिवसेनेचे सरकार असल्याने शासनाकडे महापालिकेचे आकृतीबंध प्रलंबित आहे. त्यास मान्यता मिळाल्यास वैद्यकीय विभागासाठी कायम स्वरुपी पदे भरता येईल असा सल्ला दिला.