कोरोना साखळी तोडण्यासाठी लॉकडाउनच पर्याय का? व्यापाऱ्यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल 

नाशिक : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी काही भागात अंशत:, तर काही भागात पूर्ण लॉकडाउन सुरू आहे. याव्यतिरिक्त काही शहरांमध्ये शनिवारी व रविवारी असे दोन दिवस लॉकडाऊन सुरू आहे. मात्र, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाउन हाच एकमेव उपाय नसून अन्य पर्यायी मार्गांचा अवलंब व्हावा, अशी मागणी कॉन्फिडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स नाशिक शाखेचे उपाध्यक्ष संजय सोनवणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. 

व्यापाऱ्यांचा मुख्यमंत्री ठाकरे यांना सवाल 
एप्रिल महिना व्यापाऱ्यांसाठी महत्त्वाचा असतो. २० एप्रिलपूर्वी जीएसटी अदा करावा लागतो. वेळेत जीएसटी अदा न केल्यास व्याजासहित दंड आकारला जातो. नुकताच ३१ मार्च हे आर्थिक वर्ष संपले आहे. त्यामुळे खाते पुस्तक बंद करणे आवश्‍यक आहे. कर अदा करण्यासाठी हा महत्त्वाचा महिना मानला जातो. आर्थिक वर्षाची बॅलन्सशीट सादर करावी लागते. ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास खाते एनपीए होऊ शकते. थकीत रकमेच्या वसुलीसाठी बॅंका कुठलेही पाऊल उचलू शकतात. व्हॅट, प्राप्तिकर, सेवा करांचे मूल्यांकन राज्य शासनाकडून केले जाते. लॉकडाउन झाल्यास ते शक्य होणार नाही.

हेही वाचा - क्रूर नियती! अखेरच्या क्षणी बापाला खांदा देणंही नाही नशिबी; कोरोनाबाधित मुलाचे व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे अंत्यदर्शन

सार्वजनिक व्यवहारही बंद ठेवा

रामनवमी, चेट्टीचंड, महावीर जयंती, हनुमान जयंती आदी मोठे सण या काळात असतात. त्यामुळे आस्थापना बंद असल्यास व्यापारावर मोठा परिणाम होईल. नववर्षनिमित्त वाहनांची मोठी खरेदी होते. गुढीपाडव्यानिमित्त वाहनांचे बुकिंग झाले आहे. वाहनांची विक्री न झाल्यास ऑटोमोबाईल उद्योगावर त्याचा मोठा परिणाम होईल. लग्नसराई सुरू होत असल्याने व्यापारी वर्गाला मोठी अपेक्षा आहे. मात्र, लॉकडाउन झाल्यास व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होईल. गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे. 
त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाउन हाच उपाय नाही. लॉकडाउन करायचे असेल, तर सार्वजनिक व्यवहारही बंद ठेवले पाहिजेत.

हेही वाचा - Success Story : दृष्टिबाधित ज्ञानेश्‍वरची भरारी! मेहनत, चिकाटी व स्वकष्टातून बनला बँक अधिकारी 

दुकाने संपूर्ण बंद ठेवण्याएवजी सकाळी अकरा ते सायंकाळी पाचपर्यंत सुरू ठेवावीत. शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन व्यापाऱ्यांकडून केले जाईल. लॉकडाउन जाहीर कण्यापूर्वी व्यापारी संघटनांच्या प्रमुखांशी चर्चा करावी, अशी मागणी केली आहे.