कोविड रुग्णांसाठी बिटको रुग्णालयात ‘नो एन्ट्री’? सुचना फलकातून जबाबदारी ढकलण्याचा प्रकार उघडकीस

नाशिक : जून ते ऑगस्ट महिन्यात कोरोनाने गाठलेल्या उच्चांकी पातळीवरून दर कमालीचा घसरला असतांनाही सर्दी, खोकला व अन्य कोरोना सदृश्‍य लक्षणे आढळली तरी नागरिक रुग्णालयात धाव घेत आहे. नवीन बिटको रुग्णालयात मात्र रुग्ण पोहोचल्यानंतर तेथे व्हेंटीलेटर, आयसीयुची व्यवस्था नसल्याने आपल्या जबाबदारीवर रुग्णांना दाखल करावे असा जबाबदारी ढकलणारा फलक पाहून रुग्णांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

प्रवेशद्वारावरच लावलाय सुचना फलक

एप्रिल महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर महापालिकेने डॉ. झाकीर हुसैन रुग्णालय, बिटको रुग्णालय, समाजकल्याण, मेरी, ठक्कर डोम येथे कोव्हीड सेंटरची उभारणी केली. जून ते ऑगस्ट महिन्यात कोव्हीड सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण भरती झाल्यानंतर पालिकेने अन्यत्र सोय करण्याची अपेक्षा असतांना जबाबदारी ढकलली. अद्यापही तीच परिस्थिती नाशिकरोडच्या नवीन बिटको रुग्णालयात दिसून येत आहे. बिटको रुग्णालयात नागरिकांसाठी प्रवेशद्वारावर एक सुचना फलक लावण्यात आला असून त्यात चक्क रुग्णांच्या नातेवाईकांकडून फॉर्म भरून घेतला जात असल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. 

रुग्णालय जबाबदारीपासून काढतेय पळ

सुचना फलकावर रुग्णालयात आयसीयु कक्ष व व्हेंटीलेटर नसल्याचे दर्शविण्यात आल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. दोन दिवसांपुर्वी रुग्णालयात एचआरसीटी तसेच व्हेंटीलेटर यंत्र धुळखात पडल्याचे शिवसेनेकडून निदर्शनास आणून दिले आहे. असे असतांना वैद्यकीय विभागाने सुचना फलकातून रुग्णांच्या नातेवाईकांना दिलेला ईशारा जबाबदारीपासून पळून जाणारा ठरतांना दिसत आहे. 

हेही वाचा >  देवी भक्ताच्या बँक खात्यावरही पडली वाईट नजर; महाराष्ट्रात परतताच प्रकार उघडकीस

...तर रुग्णालय जबाबदार नाही 

माझ्या नातेवाईकांची तब्येत चिंताजनक असल्याची कल्पना डॉक्टरांनी मला दिलेली आहे. माझ्या पेशंटला आयसीयु बोर्ड आणि व्हेंटीलेटरची आवशक्यता पडू शकते. परंतू ह्या गोष्टीची सोय आमच्याकडे नाही. तरी माझ्या पेशंटला काही कमी-जास्त झाल्यास त्याला मी स्वत: जबाबदार राहील. तरी हॉस्पिटल, डॉक्टर, नर्स व स्टाफविरुध्द माझी काही एक तक्रार नाही असे सुचना फलकात नमुद करण्यात आले आहे. दरम्यान यासंदर्भात पालिकेच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ. बापुसाहेब नागरगोजे यांच्याशी संपर्क साधला असता जुना सुचना फलक असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा > लॉजमध्ये सापडला प्रेयसीचा मृतदेह अन् घाबरलेला प्रियकर; काय घडले चार भिंतीत?