कोविड रुग्णालयातील खाटांची संख्या वाढवा; कृषिमंत्र्यांचे विभागप्रमुखांना निर्देश 

मालेगाव (जि. नाशिक) : शहरासह ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. रुग्णसंख्येनुसार उपाययोजना व खाटांची संख्या वाढवावी. सध्या दीड हजाराहून अधिक रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. या रुग्णांची घरोघरी जाऊन तपासणी करावी. गृहविलगीकरणातील रुग्णांची यादी आरोग्य प्रशासनाने पोलिसांना देऊन अशा रुग्णांवर वचक बसविण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यावर लक्ष ठेवावे, असे निर्देश कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिले. 

भुसे म्हणाले, की गृहविलगीकरणातील रुग्णांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कारवाईसाठी पोलिस व महापालिका प्रशासनाने संयुक्तपणे दहा पथकांची तत्काळ नियुक्ती करावी, या पथकांनी गृहविलगीकरणातील रुग्णांच्या घरोघरी जाऊन तपासणी मोहीम राबवावी, आवश्यकता भासल्यास अशा रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करावे, प्रतिबंधित क्षेत्रात उपाययोजनांचे सूक्ष्म नियोजन करावे, अधिकाराचा पुरेपूर वापर करावा, शहरात कसमादे परिसरातील उपचारासाठी रुग्ण येत आहेत. यामुळे आरोग्य प्रशासनावरील वाढता ताण लक्षात घेता चांदवड येथील ट्रामा सेंटरमध्ये ऑक्सिजन खाटा वाढवाव्यात, दाभाडीतील ३० खाटांची क्षमता वाढवून ती ५० करावी, मनमाड रेल्वे प्रशासनाचे रुग्णालय कोविडसाठी सुरू करता येईल का, ते पाहावे, महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेतील सहा रुग्णालयांचा आढावा घेऊन तेथे रुग्णांची व्यवस्था करावी, तालुक्यात पुरेसा रेमडेसिव्हिरचा साठा उपलब्ध करून द्यावा, सामान्य रुग्णालयातील ऑक्सिजन टँक सुरू करावा, नागरिकांनी प्रतिबंधित नियमांचे पालन केल्यास लॉकडाउनची आवश्यकता भासणार नाही, असेही ते म्हणाले. 

हेही वाचा - दशक्रिया विधीत अश्रू पुसण्यासाठी धावले 'माकड'! लॉकडाउनमधील दोन घासांची ठेवली कृतज्ञता

येथील शासकीय विश्रामगृहात सर्व विभागप्रमुखांची बैठक कृषिमंत्री दादा भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील उपस्थित होते. अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, प्रांताधिकारी विजयानंद शर्मा, महापालिकेचे उपायुक्त नितीन कापडणीस, रोहिदास दोरकुळकर, तहसीलदार चंद्रजित राजपूत, गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे, सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. किशोर डांगे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश निकम, डॉ. हितेश महाले, डॉ. शुभांगी अहिरे यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. 

जिल्ह्यासह तालुक्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या चिंताजनक आहे. संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्रात कठोर उपाययोजना कराव्यात. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, कोरोना, ॲन्टिजेन चाचण्या वाढवाव्यात. प्रतिबंधित क्षेत्रात बॅरिकेडींग करावे. गृहविलगीकरणासह प्रतिबंधित क्षेत्रातील रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. रुग्णांच्या मोबाईलमध्ये सक्तीने ‘महाकवच’ ॲपचा समावेश करावा. 
- राधाकृष्ण गमे, विभागीय आयुक्त 

आरटीपीसीआर व ॲन्टिजेन चाचण्यानंतरही काहीजण एचआरसीटी चाचणीसाठी आग्रह धरतात. त्यामुळे एचआरसीटी सेंटरमधून कोरोना संसर्ग वाढू शकतो. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्राशिवाय एचआरसीटी चाचण्या करू नयेत. गेल्या वर्षी कोरोना रोखण्यासाठी मृत्यूची भीती होती. आता यंत्रणेने काम करावे. आरोग्य प्रशासनातील कामाचा विलंब टाळण्यासाठी डॉ. हितेश महाले यांची घटना व्यवस्थापक म्हणून नियुक्ती करीत आहे. आगामी काळात त्यांनी उचित कार्यवाही करावी. 
- सूरज मांढरे, जिल्हाधिकारी 

हेही वाचा - आंदोलनास बसलेल्या कोरोनाबाधिताचा मृत्यू प्रकरण : दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची पत्नीची मागणी