चांदवड (जि.नाशिक) : कोविडच्या लसीकरणाला जिल्ह्यात धडाक्यात सुरवात झाली असली तरी, सर्वाधिक जोखमीचे काम करणारे जिल्ह्यातील हजारो खासगी डॉक्टर अजूनही लसीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत.
सर्वाधिक जोखीम असलेल्या घटकांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे.
कोविड लसीकरणापासून खासगी डॉक्टर वंचित
सरकारच्या आरोग्यसेवा कर्मचारी, अधिकाऱ्यांबरोबरच खासगी डॉक्टरांनी कोरोनाविरुद्धच्या लढाईत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. म्हणूनच सरकारचा असा विचार आहे की, या घटकांना कुठल्याही जोखमीशिवाय आपले काम करता यावे. यासाठी आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाइन वर्कर यांना लसीकरणासाठी प्राधान्यक्रमाने निवडलेल्या पहिल्या टप्प्यात समावेश करण्यात आला आहे. याच मार्गदर्शक तत्त्वानुसार जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी, महसूल विभाग, पोलिस विभाग व ग्रामविकास विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे लसीकरण सुरू आहे. मात्र अजूनही जिल्हाभरातील बहुतांश खासगी डॉक्टरांना लसीकरणासाठी साधा निरोपदेखील नसल्याने याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा - सिव्हील हॉस्पीटलमधून बालिका अपहरण प्रकरणी अपहरणकर्त्याकडून खुलासा! वेगळेच सत्य समोर
कोरोनायोद्ध्यांसाठी नियोजनाची मागणी
ग्रामीण भागातील खासगी डॉक्टरांकडेसुद्धा रुग्णांची संख्या अधिक असते. कोरोनाविरोधात लढा देणाऱ्या या योद्ध्यांना लसीकरणाचे सुरक्षा कवच नसतानाही लढा देणे उचित आहे का, हा प्रश्न उपस्थित होत आहे. या गोष्टींचा विचार करून जिल्हा प्रशासनाने तत्काळ नियोजन करून जिल्ह्यातील एकही डॉक्टर लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा - अख्खे गाव हळहळले! दोन सख्ख्या बहिणींच्या एकत्रच निघाल्या अंत्ययात्रा; पाच मुलांमधून आता तिघांचाच आधार
आम्ही चांदवड तालुक्यातील बहुतांश खासगी डॉक्टरांना कोविड प्रतिबंधात्मक लस दिली आहे. अजून काही खेड्यातील डॉक्टर वंचित असतील त्यांच्यासाठी नियोजन सुरू आहे.
- डॉ. पंकज ठाकरे, तालुका वैद्यकीय अधिकारी, चांदवड
मी लसीकरणासाठी नावनोंदणी केलेली असूनही मला अद्यापही लस दिली गेली नाही. माझ्यासारख्या सर्वच खासगी डॉक्टरांना तत्काळ लसीकरण करून द्यावे.
डॉ. सुनील सोनवणे, दुगाव, चांदवड
चांदवड शहरातील नावनोंदणी केलेल्या माझ्यासह ८० टक्के खासगी डॉक्टरांचे लसीकरण झाले आहे.
- डॉ आत्माराम कुंभार्डे, गटनेते, जिल्हा परिषद, नाशिक