कोव्हिशील्डला प्रतिसाद, कोव्हॅक्सिनला नकार; नाशिक शहरातील वास्तव

नाशिक : कोरोना संसर्गाला अटकाव करण्यासाठी केंद्र शासनाने मान्यता दिलेल्या कोव्हिशील्ड व कोव्हॅक्सिन या दोन लसींपैकी शहरात कोव्हिशील्डला अधिक प्रतिसाद मिळत असून, कोव्हॅक्सिन लस टोचून घेण्यास ज्येष्ठांकडून स्पष्ट नकार दिला जात असल्याने वैद्यकीय विभागाची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे कोव्हॅक्सिन लस रुग्णालयांत पडून असल्याचे वास्तव समोर येत आहे. 

शहरात वेगाने कोरोना संसर्ग पसरत असल्याने अटकाव करण्यासाठी यंत्रणा सरसावली असताना दुसरीकडे पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने (एनआयव्ही) गेल्या महिन्यात पाठविलेल्या अहवालामधील सहा नमुन्यांमध्ये युरोपियन स्ट्रेन्स आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सत्तर टक्के वेगाने पसरणाऱ्या या स्ट्रेन्सला अटकाव करण्याचे मोठे आव्हान असताना शहरात महापालिकेच्या वैद्यकीय विभागासमोर नवीनच आव्हान उभे राहिले आहे, ते कोव्हिशील्ड लसींच्या अधिक मागणीमुळे शहरात महापालिकेचे २७, तर खासगी रुग्णालयाच्या अठरा केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. कोव्हिशील्डचे ३२३ हजार डोस महापालिकेला प्राप्त झाले होते, तर कोव्हॅक्सिनचे १८ हजार डोस प्राप्त झाले होते. कोव्हिशील्डचे सर्व डोस संपुष्टात आल्याने केंद्रांवरचे लसीकरण थांबविण्यात आले. मात्र, कोव्हॅक्सिन देण्यासाठी वैद्यकीय पथक सरसावले असताना नागरिकांकडून मात्र नकार मिळत आहे.  सध्या कोव्हॅक्सिनचे चौदा हजार डोस महापालिकेकडे शिल्लक आहेत. नकार मिळत असल्याने कोव्हॅक्सिनचे डोस पडून आहेत. कोव्हिशील्ड असेल तरच लस घेऊ, अशी भूमिका ज्येष्ठ नागरिकांनी घेतल्याने अडचण निर्माण झाली आहे. दरम्यान, महापालिकेने कोव्हिशील्डच्या दीड लाख लसींची मागणी नोंदविली. परंतु त्यातील फक्त बारा हजार डोस प्राप्त होणार आहेत.  प्रतिदिन आठ हजार लसीकरण होत असल्याने दीड दिवसात कोव्हिशील्डचा साठा संपणार असल्याने  आणखी नवीन अडचण निर्माण होणार आहे. 

हेही वाचा - सटाण्यात लहान मुले सातच्या आत घरात! रात्रीच्या विचित्र प्रकाराने दहशत; युवकांचा जागता पहारा

स्वखर्चाचा दिखावा 

कोव्हिशील्ड किंवा कोव्हॅक्सिन लसीकरण ही शासनाची मोहीम आहे. परंतु, शहरात नगरसेवकांकडून स्वखर्चाने लसीकरण केले जात असल्याचा दिखावा केला जात आहे. त्यामुळे वैद्यकीय विभागाच्या कामात अडथळा निर्माण होत आहे. नगरसेवकांकडून वैद्यकीय विभागाकडे वारंवार लसींची मागणी होत असल्याने ‘दुष्काळात तेरावा महिना’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. 

शहरात कोव्हॅक्सिन लस टोचण्यास नकार मिळत आहे. कोव्हिशील्डचे डोस संपल्याने नोंदविलेल्या मागणीपैकी बारा हजार डोस प्राप्त होणार आहेत. 
- डॉ. बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधीक्षक, महापालिका 

हेही वाचा -  नाशिकमध्ये आता कोरोनाचा युरोपियन स्ट्रेनचे संकट; काय आहे हा बी.१.१.७ स्ट्रेन? डॉक्टरांची माहिती