कौतुकास्पद! बँकेच्या पायरीवर पडलेले ५० हजार रुपये केले परत

सटाणा (जि.नाशिक) : सध्याच्या काळात पैसा हेच मानवाचे सर्वस्व होऊन बसले आहे. पन्नास हजार रुपये सापडल्यानंतर कोणालाही त्याचा मोह होईल, मात्र येथील सटाणा येथील बँक व्यवस्थापकांनी प्रामाणिकपणाचे एक अनोखे उदाहरण समाजासमोर ठेवले आहे. त्यामुळे सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.

'बँकेच्या पायरीवर पडलेले ५० हजार रुपये केले परत

बँक प्रशासनानेही संबंधित ज्येष्ठ नागरिकाचा शोध घेऊन ती रक्कम सुपूर्द करून अहिरराव व कायस्थ यांचा बुधवारी (ता. १६) सत्कार केला. 
येथील पंडित त्र्यंबक सोनवणे यांनी मंगळवारी (ता. ८) बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेतून पेन्शन खात्यातून ५० हजार रुपये काढून समकोच्या सेव्हिंग खात्यात ही रक्कम भरण्यासाठी ते दुपारी एकला आले असता नजरचुकीने बँकेच्या पायरीवर ५० हजार रुपयांचे बंडल पडले, मात्र हे त्यांच्या लक्षात आले नाही. यानंतर ते पैसे भरण्यासाठी काउंटरवर आले असता ५० हजार रुपये कुठेतरी पडल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी पुन्हा महाराष्ट्र बँक गाठून चौकशी केली, मात्र तेथेही पैसे सापडले नाहीत. कौटुंबिक कारणांमुळे त्यांनी इतरत्र कुठेही याबाबत वाच्यता केली नाही किंवा बँक प्रशासनाकडे तक्रारही न करता त्यांनी सरळ घर गाठले. 

हेही वाचा>> अवघ्या पंचक्रोशीचे काळीज हेलावले! जेव्हा लष्करी अधिकारी 'तिरंगा' वीरपत्नी धारित्रींना सुपूर्द करतात तेव्हा...

बॅंकेत परत केले पैसे

दरम्यान, बँकेचे अल्पबचत प्रतिनिधी चंद्रकांत अहिरराव व बँकेचे ग्राहक नीलेश कायस्थ यांना बँकेच्या पायरीवर ५० हजार रुपयांचे बंडल सापडले. त्यांनी ही रक्कम प्रामाणिकपणे बँकेचे व्यवस्थापक जितेंद्र बागड यांच्याकडे जमा केली. बागड यांनी ही घटना बँकेचे अध्यक्ष कैलास येवला आणि मुख्य कार्यकारी अधिकारी देवीदास बागडे यांच्या निदर्शनास आणून दिली. मात्र याबाबत कुणाचीही तक्रार न आल्याने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पंडित त्र्यंबक सोनवणे यांच्याकडून ५० हजार रुपये पडल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. अध्यक्ष येवला यांनी सोनवणे यांना फोनद्वारे विश्वासात घेऊन या प्रकाराबाबत विचारणा केली असता त्यांनी पैसे गहाळ झाल्याचे सांगितले.

हेही वाचा - दुर्दैवी! एकीकडे बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद; दुसरीकडे क्षणार्धात भावाची निघाली अंत्ययात्रा

५० हजार रुपये बँकेकडे सुपूर्द

मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेचे अल्पबचत प्रतिनिधी चंद्रकांत अहिरराव आणि बँकेचे ग्राहक नीलेश कायस्थ यांनी एका ज्येष्ठ नागरिकाचे समको बँकेच्या पायरीवर पडलेले ५० हजार रुपये बँकेकडे सुपूर्द केले. या वेळी उपाध्यक्षा कल्पना येवला, संचालक दिलीप चव्हाण, प्रकाश सोनग्रा, पंकज ततार, प्रवीण बागड, दिलीप येवला, जगदीश मुंडावरे, मुख्य कार्यकारी अधिकारी देवीदास बागडे, शाखाधिकारी जितेंद्र बागड, अधिकारी देवेंद्र बिरारी, भरत पवार आदी उपस्थित होते.