क्रूर नियती! लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच हिरावला घरचा कर्ता पुरुष; कुटुंबियांना अश्रू अनावर

सिन्नर (नाशिक) : जुन्या पुणे महामार्गावरील घटना...घरी दिवाळी सणाची तयारी सुरु होती. कामानिमित्त ते गावात आले होते. घरी परतत असतांना अचानक काळाने दिली धडक अन् दिवाळीत घरचा कर्ता पुरुष देवाला झाला प्रिय. वाचा काय घडले नेमके?

दिवे लागणीच्या वेळेला घडला प्रकार...

शुक्रवारी (ता. १३) सायंकाळ साडेसात वाजेची वेळ. घरी दिवाळीची लगबग सुरु होती. दिवसभर काम करुन जरा वेळ गावात गेलेल्या बायपासवरील शेळके वस्तीवर राहणारे नवनाथ अमृता शेळके (वय ४२) यांच्यावर नियतीने घाव केला. नांदूरशिंगोटे गावातून जाणाऱ्या जुन्या पुणे महामार्गावरील हॉटेल आदितीजवळ एसटीने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र शनिवारी (ता. १४) लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.  

कुटुंबियांचा आक्रोश

अन् दिवाळीत घरचा कर्ता पुरुष हिरावल्याने कुटुंबात शोकाकूल वातावरण आहे. त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुलगे, मुलगी असा परिवार आहे. ऐन दिवाळी सणाच्या दिवशी नवनाथ यांचा मृत्यू झाल्याने गावात देखील हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत वावी पोलीस ठाण्यात मोटार अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.