क्लीन चिट मिळेपर्यंत नस्तीवर स्वाक्षरी करणार नाही; उद्यान उपायुक्तांचा पवित्रा

नाशिक : शहरातील उद्यानांमध्ये खेळणी व नगरसेवकांच्या मागणीनुसार बेंचेस खरेदी करताना कामांचे तुकडे करून ई-निविदा प्रक्रिया टाळल्याचा कथित आरोपावरून व्यथित झालेल्या उद्यान उपायुक्त शिवाजी आमले यांनी जोपर्यंत चौकशी समितीकडून क्लीन चिट मिळत नाही तोपर्यंत उद्यान विभागाच्या एकाही नस्तीवर स्वाक्षरी न करण्याचा निर्णय घेतल्याने निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर नगरसेवकच अडचणीत आले आहेत. महापालिकेच्या इतिहासात आरोपाने व्यथित झालेल्या एखाद्या अधिकाऱ्याने प्रथमच टोकाची भूमिका घेतल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. 

निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर नगरसेवकच अडचणीत 

गेल्या आठवड्यात झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत कोटेशन व नगरसेवकांच्या पत्राच्या आधारे खेळणी व बेंचेस खरेदी करण्यात आल्याचा आरोप स्थायी समितीचे सदस्य व शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केला होता. निविदा न काढता पाच लाख रुपयांच्या कामाचे तुकडे करून ई-निविदेला फाटा देण्यात आल्याने कामामध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करताना स्थायी समितीसमोर अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु स्थायी समितीमध्ये अहवाल सादर न झाल्याने बडगुजर यांनी उद्यान उपायुक्त आमले यांना सभागृहाबाहेर काढण्याची मागणी केली होती. 

नगरसेवकांच्या विकासकामांच्या फाइल्स पडून 

अपमानास्पद वागणूक मिळाल्याने आमले व्यथित झाले. उद्यान उपायुक्त म्हणून रुजू झाल्यापासून मंजुरी घेतलेल्या व स्वाक्षरी केलेल्या कागदपत्रांचा गठ्ठाच त्यांनी आयुक्त कैलास जाधव यांच्यासमोर ठेवला. क्लीन चिट मिळत नाही तोपर्यंत बेंचेस, खेळणी खरेदीच्या फाइल्सवर स्वाक्षरी न करण्याचा निर्णय त्यांनी घेतल्याने नगरसेवकांच्या विकासकामांच्या फाइल्स पडून आहेत. 

हेही वाचा > ''माझ्या बायकोला आधी वाचवा हो'', रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नवऱ्याचा आक्रोश; दुर्देवी घटना

महापालिकेत काम करताना चौकशीची टांगती तलवार राहणार असल्याने चौकशीत क्लीन चिट मिळत नाही तोपर्यंत विकासकामांच्या स्वाक्षरी करण्याचा अधिकार नाही. - शिवाजी आमले, उपायुक्त, उद्यान विभाग

हेही वाचा >  ‘कोब्रा-घोणस’च्या लढाईचा थरार! मांजराने केली मध्यस्थी; पाहा VIDEO