खंडेरायाचे दर्शन बंद दाराआडूनच! मंदिराबाहेर मात्र येळकोटच्या गजरात भंडा-याची जोरदार उधळण

पंचवटी (नाशिक) : चंपाषष्टीचे औचित्य साधत अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री खंडेराव महाराज देवस्थाना यंदा आकर्षक विद्युत रोषणाई सजली खरी. परंतु कोरोना प्रादुर्भावाच्या धास्तीने प्रशासनाने देऊळबंदचा पर्याय स्वीकारल्याने भाविकांना खंडेरायाचे दर्शन बंद दाराआडूनच घ्यावे लागले. मंदिराबाहेर मात्र येळकोटच्या गजरात भंडा-याची जोरदार उधळण करण्यात आली. 

भाविकांना कुलदैवताचे दर्शन बंद दाराआडूनच!
चंपाषष्टीनिमित्त दरवर्षी गंगाघाटावरील खंडेराव महाराज देवस्थानची यात्रा भरते. यावेळी दर्शनासाठी मोठी गर्दी उसळते. सायंकाळच्या वेळी तर दर्शनाची रांग थेट रामसेतूपर्यंत पोहोचते. यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस, महापालिका प्रशासनाने खंडेराव महाराज यात्रेसह पुढील आठवड्यातील एकमुखी दत्त यात्रोत्सवाला परवानगी नाकारल्याने हे दोन्ही उत्सव रद्द झाल्याचे संबंधितांनी कळविले. तरीही आज पहाटेपासून भाविकांनी खंडेरावाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. योवळी मोठ्या प्रमाणावर बेलभंडा-याची उधळण करण्यात आली. येळकोट येळकोट जयमल्हार मात्र देऊळबंदीमुळे भाविकांना बाहेरहूनच देवदर्शनावर समाधान मानावे लागले. दरवर्षी पेठरोडसह अन्य ठिकाणच्या पालखी गंगाघाटावरील खंडोबाच्या भेटीस येत असत. त्यांनाही यंदा मज्जाव करण्यात आला आहे. 

हेही वाचा >> बळीराजाच्या नशिबी दुर्दैवच; जेव्हा स्वत:च्याच डोळ्यादेखत संसाराची राखरांगोळी होते तेव्हा..

तळी भरण्यास उसळली गर्दी 
चंपाषष्टीनिमित्त अनेक कुटुंबात तळी भरण्याची प्रथा असते. त्यासाठी पाचजण तळी भरतात. हा सोहळा प्रामुख्याने सायंकाळी घराघरात साजरा होतो. मात्र त्याचवेळी अनेकजण गंगाघाटावर उपस्थितांकडून तळी भरून घेतात. अशी तळी भऱण्यासाठी मंदिराजवळ मोठी गर्दी उसळली होती. याठिकाणी अधिक गर्दी होऊ नये, तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिसही मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

हेही वाचा >> मनाला चटका लावणारी बातमी! माऊलीच्या नशिबी दोनदा दफनविधी अंत्यसंस्काराचा योग; जुळली मुलांशी झालेली ताटातूट

अर्थकारण रोडावले 
चंपाषष्टीनिमित्त होणा-या या यात्रेसाठी मोठी गर्दी उसळते. त्यासाठी खेळणीसह खाद्य पदार्थ्यांची दुकाने यापरिसरात मोठ्या प्रमाणावर लागतात. यंदा प्रशासनाने कंबर कसल्याने गत कित्येक वर्षात प्रथमच यात्रोत्सव रद्द झाला आहे. त्यामुळे येथील अर्थकारणही रोडावले.