खबरदारी घ्या! लग्न, समारंभावर लक्ष ठेवण्यासाठी भरारी पथके 

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे सगळीकडे खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नियम पाळले न गेल्यास पुन्हा लॉकडाऊनचा ईशारा देताना स्थानिक पातळीवर सुचना दिल्या होत्या.

शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्या सूचनेवरून लग्न सोहळे, हॉटेल्स, रेस्टॉरन्टमध्ये कोरोना नियमांचे पालन होत आहे कि नाही, हे पाहण्यासाठी भरारी पथके नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विभागीय अधिकाऱ्यांकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. 

हेही  वाचा - थरारक! सिटबेल्टमुळे पेटलेल्या गाडीत अडकला चालक; नातेवाईकांना घातपाताचा संशय

नियमांचे पालन करण्याच्या सूचना 

गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण शहरात आढळून आला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने रुग्ण संख्येत वाढ होत गेली. जून ते सप्टेंबर या पाच महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक होती. ऑक्टोंबर महिन्यात रुग्ण संख्या घटण्यास सुरवात झाली. जानेवारी महिन्यात दिडशेच्या आत रुग्ण आढळून येत असल्याने सर्वांनीच निश्‍वास सोडला. मात्र शाळा, महाविद्यालये, लोकल, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील तसेच लग्न, समारंभ, हॉटेल, रेस्टॉरन्ट आदीवरील निर्बंध शिथिल केल्यानंतर गर्दीचे नियम धुडकावले गेले. त्यामुळे कोरोना रुग्णांमध्ये वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. नाशिक शहरातही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर आयुक्त कैलास जाधव यांनी शहरात नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार विभागिय अधिकाऱ्यांना सहा विभागात लग्न समारंभ, सार्वजनिक कार्यक्रम, मंगल कार्यालये, हॉटेल, मैदाने आदी ठिकाणी देखरेख करण्यासाठी पथके तैनात करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा - नियतीने पुन्हा तिचे बाळ 'तिच्या' झोळीत टाकले! मातेचे कोरडे पडलेले डोळे पुन्हा पाणावले