खर्च सादर करणाऱ्यांना अपमानास्पद वागणूक; निवडणूक अधिकाऱ्यांविरोधात तक्रार

किकवारी बुद्रुक (नाशिक) : बागलाण तालुक्यातील नुकत्याच पार पडलेल्या ४० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची धामधूम शांत झाली आहे. निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांची निवडणूक खर्च सादर करण्याची लगबग सुरू झाली आहे. निवडणूक खर्च सादर करण्याबाबतची माहिती येथील सहाय्यक निवडणूक अधिकारी बहिरम यांना एका नवनिर्वाचित सदस्याने विचारली असता संबंधित अधिकाऱ्याकडून योग्य माहिती न देता अपमानास्पद वागणूक दिल्याची तक्रार करण्यात आली आहे. 

नवनिर्वाचित सदस्यांची तक्रार 

ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांना एका महिन्यात निवडणूक खर्च सादर करणे बंधनकारक असल्याने तालुक्याच्या ठिकाणी नागरिकांची वर्दळ वाढली आहे. निवडणूक खर्च सादर करताना नवनियुक्त सदस्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याबाबतची माहिती संबंधित कार्यालयाच्या फलकावर लावली नसल्याने निवडणूक खर्च सादर करावयाचा कोणाकडे, असा प्रश्‍न नागरिकांना पडत आहे. कंधाणे येथील नवनियुक्त सदस्य शशिकांत बिरारी आपला निवडणुकीचा खर्च सादर करण्यासाठी सटाणा तहसील कार्यालयात गुरुवारी (ता. २१) गेले. त्या वेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी व नायब तहसीलदार बहिरम यांना विचारणा केली असता संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य माहिती न देता संबंधितांना अपशब्द वापरले. त्यामुळे निवडणूक खर्च सादर करण्यासाठी लागणारी माहिती संबंधितांनी कार्यालयाच्या फलकावर लावावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. योग्य वेळात माहिती सादर झाली नाही तर संबंधितांच्या पदावर गंडांतर येऊ शकते, तसेच बरेच सदस्य नवीनच असल्याने त्यांना याबाबत माहिती उपलब्ध होत नाही. संबंधितांना याबाबत वरिष्ठांकडून सूचना देण्यात याव्या, अशी मागणी जोर धरू लागली आहे. 

हेही वाचा > तो शेवटचा विवाहसोहळा! काही समजण्याच्या आतच विवाहितेची जीवनयात्रा संपली; वाडीचौल्हेर गावात शोककळा

निवडणूक खर्च सादर करताना आलेल्या अडचणींबाबत संबंधित अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी अपमानास्पद वागणूक देत अर्वाच्य भाषेचा वापर केला. याबाबत न्याय मिळविण्यासाठी वरिष्ठांकडे पत्रव्यवहार करणार आहे. - शशिकांत बिरारी, नवनियुक्त सदस्य, कंधाणे  

हेही वाचा > ''माझ्या बायकोला आधी वाचवा हो'', रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नवऱ्याचा आक्रोश; दुर्देवी घटना