खवय्याच्या तोंडी पाणी आणणारी नाशिकची तर्रीबाज मिसळ! थक्क करणारा मिसळचा प्रवास

नाशिक : नाशिकच्या प्रवासात अनेक गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. त्यांचा प्रवासही थक्क करणारा आहे. मग ते कधी मंदिर, पुरातन वाडे, निसर्गरम्य ठिकाण, साहित्यिकांचा वा जगप्रसिद्ध वाइनचेही असतात. पण, या प्रवासातला एक अगदी मनाचा ठाव घेणारा आणि प्रत्येक खवय्याच्या तोंडी पाणी आणणारा थांबा म्हणजे मिसळ. होय, नाशिकची मिसळ....नाशिकची खाद्यसंस्कृती म्हटलं की डोळ्यापुढे पहिल्यांदा अवतरते ती तर्रीबाज मिसळच..

कशी सुरू झाली नाशिकची पहिली मिसळ?
नाशिकमध्ये पहिली मिसळ कोणी सुरू केली, कधी सुरू केली, कुठे मिळत होती, याबाबत अनेक मतमतांतरे आहेत.काही जुन्या पिढीतील व्यक्ती सांगतात कि, साधारण ९० ते १०० वर्षांपूर्वी काही जण घरून मिसळ बनवून गोदाघाटावर विकायचे. मिसळच्या स्पर्धेत नाशिकही अग्रेसर आहे. आणि याच मिसळने नाशिकला एक जागतिक ओळखही मिळवून दिली आहे. नाशिकला येणारा प्रत्येक पर्यटक मग तो परप्रांतीय असो की परदेशी ही मिसळ खाल्याशिवाय पुढे जातच नाही असे चित्र आहे.

हेही वाचा - रक्षेसाठी राखी बांधलेले हातच रक्ताने माखलेले! रक्षणकर्ता भाऊच बनला बहिणीसाठी काळ

आजची १०० रुपयांची मिसळ पूर्वी २५ पैशाला 
नाशिकच्या गोदाघाटावर पूर्वी भाजीबाजार, धान्यबाजार, दूधबाजार, बैलबाजार असे सगळे बाजार भरत. त्यामुळे खेड्यातून आलेले शेतकरी घरून भाकरी बांधून आणत आणि येथे आल्यावर मिसळ घेत. मिसळसोबतचा पाव खूप अलीकडे आला. पूर्वी केवळ मटकीची उसळ, थोडे फरसाण, पोहे आणि रस्सा अशीच मिसळ होती. तेव्हा गोदाघाटावरील गंगा टी हाऊसची मिसळ खूप प्रसिद्ध होती. नाशिकच्या मिसळच्या प्रवासात आणखी एक नाव म्हणजे 'कमला विजयची मिसळ.' या हॉटेलचे वैशिष्टे म्हणजे येथे सकाळी नाशिकची, तर सायंकाळी पुणेरी मिसळ मिळत असे. मेनरोडवर १९१२ साली सुरू झालेल्या भगवंतराव टी हाऊसमध्ये कालांतराने मिसळ सुरू झाली. जुन्या नाशिकमध्ये साधना मिसळही खूप प्रसिद्ध होती. आज शंभर रुपयांच्या घरात पोहोचलेली मिसळ पूर्वी २५ पैशाला मिळत होती, असे सांगितले जाते सत्तर वर्षांपूर्वी जुन्या नाशिकमधील चव्हाट्यावर सुरू झालेल्या सीताबाई मोरे यांच्या मिसळचाही या प्रवासात तितकाच वाटा आहे. आजही येथे बशीत केवळ मिसळ मिळते. पापड, लिंबू, कांदा असलं काही मिळत नाही.

मिसळला जागतिक दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न
नाशिक आणि नाशिकची मिसळ ही परंपरा नंतर अनेक हॉटेल्सने पुढे नेली आहे. भगवती, अंबिका, सुदर्शन, विहार, जय दुर्गा, तुषार, श्यामसुंदर, मामाचा मळा आणि प्रत्येक चौकाचौकातील गाडेवालेही मिसळ प्रवासातील पालखीचे भोई झाले आहेत. मोड आलेले मठ, फरसाण, रस्सा असलेली मिसळीचा साज आता यांनी वाढविला आहे. एक मोठं व्यासपीठ मिसळला यांच्यामुळे मिळाले आहे. नाशिकच्या मिसळला जागतिक दर्जा कसा मिळेल यासाठी प्रयत्नही सुरू केले आहेत.

हेही वाचा - केवळ दैव बलवत्तर म्हणून बिबट्याच्या हल्ल्यातून वाचले बहिण-भाऊ; साक्षात मृत्यूच्या दाढेतून परतले

मिसळ आणि पर्यटन

पूर्वीची मिसळ आणि आताच्या मिसळमध्ये तसा खूप फरक जाणवतो. आता मिळणाऱ्या मिसळभोवती आता पापड, कांदा-लिंबू, दही, ताक, सोलकढी, गुळाची जिलेबी, पावऐवजी भाकरी, रस्सा आणि तर्रीची लहान बादली असते. अनेक हॉटेल्सने मिसळला पर्यटनाची जोड दिली आणि मिसळला एका उंचीवर नेले. 'मिसळपाव'हे करिअर म्हणून अनेक तरुण या क्षेत्रात उतरले आहेत. त्यामुळे नाशिकमध्ये आता काळ्या, तांबड्या, लाल-पांढऱ्या रस्स्याची मिसळ, चुलीवरची मिसळ, वरवंट्यावर वाटलेल्या मसाल्याची मिसळ, मुगाची मिसळ, जैन मिसळ, तंदूर मिसळ, पंचरंगी मिसळ, निखारा मिसळ याबरोबरच नॉनव्हेज मिसळचाही जमाना आता आला आहे.

 मिसळ एक संस्कृती!

नाशिकची मिसळ आता केवळ मिसळ राहिली नसून, ती एक संस्कृती झाली आहे. विकेण्डला सर्वांचे भेटण्याचे ठिकाण म्हणजे मिसळपार्टी. निवडणुकांमध्ये इथले पुढारी एकाच टेबलावर मिसळ पाव खाताना दिसतात तर इथले कलावंतही आठवड्यातून एकदा मिसळच्या टेबलावर थाप मारतात. अनेक साहित्यिक इथे आल्यावर खुलतात. इतकंच कशाला साधा मोबाइल घेतला तरी मिसळपार्टी रंगते. पार्टी तर केवळ निमित्त असते, खरी ओढ असते ती मिसळची.