‘खाकी’साठी तरुणाई मैदानात, नाशिकमध्ये किती जागा?

पोलिस भरती नाशिक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक शहर व ग्रामीण पोलिस दलातील शिपाईपदाच्या रिक्त जागांसाठी बुधवारपासून (दि.१९) भरतीप्रक्रिया सुरू झाली. ‘रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेटिंफिकेशन’चा वापर करून धावण्याच्या चाचणीतील गुण नमूद करण्यात येत असल्याने प्रत्येक सेकंदाला महत्त्व आले आहे. इच्छाशक्तीच्या जोरावर प्रत्येक जण नशिब आजमावत असून, भरतीप्रक्रियेत यश मिळवण्याच्या हेतूनेच उमेदवार मैदानात उतरल्याचे चित्र आहे.

शहर पोलिस दलातील ११८ आणि ग्रामीण मधील ३२ जागांसाठी १० हजार ९४२ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. या उमेदवारांची बुधवारपासून मैदानी चाचणी प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे नाशिकसह इतर जिल्ह्यांमधील उमेदवारांनी नाशिक गाठले आहे. बुधवारी ज्यांची चाचणी होती, त्यांनी मध्यरात्रीच सुनिश्चित मैदानावर गर्दी केली होती. पहाटे ५ नंतर १,६०० मीटर धावल्यानंतर दिवसभरात १०० मीटर व गोळाफेकची चाचणी उमेदवारांनी पूर्ण केली. शहर पोलिसांची मैदानी चाचणी हिरावाडी येथील मीनाताई ठाकरे स्टेडियम येथे, तर ग्रामीण पोलिसांची चाचणी आडगाव येथील अधीक्षक कार्यालयासमोरील कवायत मैदानात होत आहे.

शंकांचे वरिष्ठांकडून निरसन

भरतीसाठी बाहेरगावाहून विद्यार्थी येत असल्याने त्यांच्याकडील कागदपत्रे पडताळणीत काही अडचणी उदभवल्याचे दिसले. त्वरित झेरॉक्स व फोटो उपलब्ध व्हावेत, म्हणून मैदानातच झेरॉक्स आणि फोटो केंद्र सुरू करण्यात आले आहे. यासह ज्या उमेदवारांना अडचणी येत आहेत. त्यांच्या शंकांचे निरसन थेट उपायुक्त व अपर अधीक्षकांमार्फत होत आहेत. अपिलांसाठी स्वतंत्र कक्ष कार्यान्वित ठेवला आहे.

मैदानावरच सर्व व्यवस्था

उमेदवारांची धावपळ होऊ नये व त्यांचा वेळ वाचावा यासाठी मैदानावरच प्रवर्गनिहाय कागदपत्रे पडताळणी केली जात आहे. त्यासाठी संगणक कक्ष उभारले आहेत. ध्वनिक्षेपकांवरून उमेदवारांना वेळोवेळी सूचना दिल्या जात आहेत. शहरात उपायुक्त, सहायक आयुक्त, तर ग्रामीणमध्ये अपर अधीक्षक मैदानातच ठाण मांडून आहेत. पोलिस आयुक्त व अधीक्षकांचे मिनी कार्यालय कार्यान्वित करण्यात आले आहे. १००, १,६०० मीटर धावण्यासह, गोळाफेक व इतर चाचणीचे चित्रीकरण केले जात आहे. गुण नोंदवल्यावर उमेदवारांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या जात आहेत. गुणांसह चाचणीच्या तपशिलांचे फलक आहेत. तसेच एका तुकडीत २० उमेदवारांची चाचणी घेतली जाते.

वेळेचे भान

चाचणीत उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवारांचे प्रयत्न असून, वेळेचे भान राखत १००, १,६०० मीटर धावण्याची चाचणी पूर्ण करण्यावर उमेदवारांचा कल आहे. ग्रामीण पोलिसांनी आडगावलगतच्या डांबरी रस्त्यावर तर शहर पोलिसांनी मीनाताई ठाकरे स्टेडियमच्या सिंथेट्रिक ट्रॅकवर या चाचण्या घेतल्या. गुणवत्ता यादीत येण्यासाठी ७ मिनिटांपैकी ५.१० मिनिटांत धाव पूर्ण करण्यात उमेदवारांची कसोटी लागली. तर अनेक उमेदवारांनी पाच मिनिटांत धाव पूर्ण करून अधिक गुण मिळविले. ज्यांनी मैदानी चाचणीत अपेक्षित यश मिळवले त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होते.

नावाएेवजी चेस्ट क्रमांक

शहर व ग्रामीण दलातील भरतीसाठी नाशिक जिल्ह्यासह नाशिकसह धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांतून उमेदवार येत आहेत. बुधवारी मध्यरात्री १.३० पासूनच उमेदवारांनी मैदानालगत गर्दी केली. उमेदवारांचे ओळखपत्र व कागदपत्रे तपासून त्यांना मैदानात प्रवेश देण्यात आला. पारदर्शक भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे नाव घेणे पोलिसांनी टाळले. त्यांना चेस्ट क्रमांक दिल्यानंतर ती ओळख उमेदवारांची होती.

वॉटर प्रूफ मंडप

बुधवारी पहाटेच्या सुमारास कागदपत्रांची पडताळणी करून उमेदवारांना चेस्ट क्रमांक दिल्यानंतर पहिल्या टप्प्यात १,६०० मीटर धावण्याची चाचणी घेण्यात आली. ढगाळ वातावरणामुळे उमेदवारांना दिलासा मिळाला. तर दुपारी पावसाने हजेरी लावली. मात्र १०० मीटर धावण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी वॉटर प्रूफ मंडप उभारला आहे. त्यामुळे या चाचणीत पावसाचा व्यत्यय दिसला नाही. त्यामुळे उमेदवारांनीही वेळेत चाचणी पूर्ण केल्याचे दिसले.

हेही वाचा –