खासगी कोव्हीड रुग्णालये बंद करण्याची मागणी; कोरोना उतरणीला लागल्याचा परिणाम 

नाशिक : ऑक्टोंबर महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या सहा ते सात पटींनी घसरल्याने आता खासगी कोव्हीड रुग्णालयांमध्ये रुग्ण नसल्याने कोव्हीड सेंटर म्हणून जाहीर करण्यात आलेली रुग्णालये बंद करण्याची मागणी ७२ पैकी दहा रुग्णालयांनी केली आहे. परंतू हिवाळ्यात दुसरी लाट निर्माण होण्याची शक्यता असल्याने पालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून तुर्त रेड सिग्नल दिला आहे. 

वैद्यकीय विभागाकडे मागणी, कोरोना उतरणीला लागल्याचा परिणाम 
एप्रिल महिन्यात शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने रुग्ण संख्येत वाढ होत गेली. मे अखेर पर्यंत नियंत्रणात असलेला कोरोना जुन नंतर मोठ्या प्रमाणात फैलावला. ऑगष्ट, सप्टेंबर महिन्यात कोरोनाचे मागचे सर्व रेकॉर्ड तोडले. ऑक्टोंबर महिन्यात मात्र कोरोनाचा आलेख खालावला. सोळा व सतरा नोव्हेंबर या दिवशी निचांकी १९९ रुग्ण शहरात आढळून आले.

अवघे सहाशे रुग्ण उपचार घेत आहेत

मे महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर महापालिकेने डॉ. जाकीर हुसैन रुग्णालय, नाशिकरोड येथील नवीन बिटको रुग्णालय, नाशिक-पुणे महामार्गावरील समाजकल्याण, मेरी येथील वसतीगृह, ठक्कर डोम येथील कोव्हीड सेंटर मध्ये १,५२५ बेडची व्यवस्था केली. परंतू ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात रुग्ण संख्या वाढल्यानंतर खाटा मिळतं नसल्याने खासगी रुग्णालयांमघीव ८० टक्के खाटा अधिग्रहीत करताना तब्बल ४,३४९ पर्यंत खाटांची संख्या पोहोचविली. ७२ खासगी रुग्णालये कोव्हीड सेंटर म्हणून जाहीर करण्यात आली. सध्या महापालिका, शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये अवघे सहाशे रुग्ण उपचार घेत आहेत. जवळपास ९० टक्के खाटा रिक्त आहे. खासगी रुग्णालयांमधील खाटा कोरोना रुग्णांसाठी आरक्षित असल्याने त्या खाटांवर अन्य आजारांचे रुग्ण दाखल करता येत नाही त्यामुळे १० रुग्णालयांनी कोविडचे नियंत्रण हटवण्याची मागणी केली आहे. 

हेही वाचा > मामाने वाचवले पण नियतीने हिरावले! चिमुकल्या जयाची मृत्युशी झुंज अपयशी

वैद्यकीय विभागाची कोंडी 
कोव्हीड रुग्णांसाठी राखिव असलेल्या खाटांवर रुग्ण नसल्याने कोव्हीड नियंत्रण हटविण्याची मागणी खासगी रुग्णालयांकडून होत असताना दुसरीकडे शासनाच्या आरोग्य विभागाने हिवाळ्यात कोरोनाची दुसरी लाट निर्माण होण्याची शक्यता वर्तविताना सप्टेंबर महिन्यातील कोरोना रुग्णांची सर्वोत्तम संख्येनुसार दहा टक्के बेड आरक्षित करण्याच्या सुचना दिल्या आहेत त्यामुळे वैद्यकीय विभागाची कोंडी झाली आहे. 

हेही वाचा > मोकाट कुत्र्याच्या तावडीत इवलेसे बिथरलेले पाडस; युवकांनी दिले जीवदान