खासगी बसचालकांना आरटीओचा दणका; जिल्ह्यातील विविध ठिकाणी धडक कारवाई 

म्हसरूळ (जि. नाशिक) : प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) शुक्रवारी (ता. ५) रात्री अचानक खासगी बसची तपासणी मोहीम सुरू केल्याने खासगी बसचालकांचे धाबे दणाणले आहेत. प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे यांच्यासह २० अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणी खासगी बसची तपासणी केली. यात ५४ बसवर ही कारवाई केली आहे. 

नियम न पाळणाऱ्यांविरोधात अचानक धडक मोहीम

प्रादेशिक परिवहन विभागाने महसूल वसुलीकडे लक्ष केंद्रित केले असून, नियम न पाळणाऱ्या खासगी बसविरोधात अचानक धडक मोहीम राबवून सुरवात केली आहे. यात विनापरवाना त्याचप्रमाणे परवान्याच्या अटींचा भंग करून वाहन चालवणे, राज्य तसेच परराज्यातील खासगी प्रवासी वाहने, प्रवासी बसमधून अवैधरीत्या मालवाहतूक करणे, बसेच पासिंग नसणे (योग्यता प्रमाणपत्र नसणे), बसची रिफ्लेक्टर, इंडिकेटर, टेल लाइट, वायपर आदींची तपासणी करण्यात आली. तसेच, वाहनांमध्ये बेकायदेशीर केलेले बदल, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी, वाहन कर, प्रवाशांकडून जादा भाडे आकारणे आदींची या वेळी तपासणी करण्यात आली.

हेही वाचा - अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच

५४ बसवर कारवाई

जिल्ह्यातील नाशिक-धुळे मार्ग, द्वारका, पुणे रोड, सिन्नर, घोटी टोल नाका, येवला, बोरगाव चेक पोस्ट, नाशिक-मुंबई मार्ग आदी ठिकाणी खासगी बसची तपासणी केली. याठिकाणी केलेल्या तपासणीत जवळपास ५४ बसवर कारवाई करण्यात आली. अचानक केलेल्या कारवाईत स्वतः प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम, वासुदेव भगत, हेमंत हेमाडे, योगेश तातू, मोटर वाहन निरीक्षक विलास चौधरी, सचिन पाटील, समीर शिरोडकर, अनिल धात्रक, भीमराज नागरे, संदीप शिंदे, विजय सोळसे, राजेंद्र कराड, उमेश तायडे, सुनील पाटील, सहायक मोटर वाहन निरीक्षक दिनेश पाटील, संदीप तुरकणे आदी सहभागी झाले होते.  

हेही वाचा - ही कसली स्टंटबाजी? पठ्ठ्याचे शेतात चक्क बिबट्यासोबत फोटोसेशन; VIDEO व्हायरल