खासगी रुग्णालयात ८० टक्के बेड कोरोनासाठी राखीव ठेवा, महापालिकेच्या सूचना

नाशिक : कोरोना संसर्गाची परिस्थिती नियंत्रणात येत असताना महापालिकेकडे कोविड सेंटर म्हणून मान्यता रद्द करण्यासाठी तगादा लावणाऱ्या खासगी रुग्णालय प्रशासनाने आता पुन्हा कोविडचे निमित्त करून रुग्णांची अडवणूक सुरु केली आहे. यासंदर्भात तक्रारी प्राप्त झाल्याने अखेरीस महापालिकेने दर तासाला दर्शनी भागावर बेड संदर्भात माहिती लावणे बंधनकारक केले आहे. तसेच ८० टक्के बेड कोरोनासाठी राखीव ठेवण्याच्या सूचना देताना त्यावर सरकारी दराने बिल आकारणीच्या सूचना दर नियंत्रण समितीने दिल्या आहेत.

गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर महापालिकेने कोविड सेंटरची निर्मिती केली होती. त्यानंतरही रुग्ण संख्या वाढत गेल्याने खासगी रुग्णालयांमध्ये ८० टक्के बेड राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला होता. कोविड सेंटर म्हणून मान्यता घेण्यासाठी महापालिकेकडे गर्दी झाली होती. परंतु, जसा कोरोनाचा जोर ओसरू लागला. त्याप्रमाणे कोविड मान्यता रद्द करण्याची मागणी होऊ लागली. कोविड सेंटर म्हणून मान्यता असलेल्या रुग्णालयाकडून गेल्यावर्षी मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार महापालिकेने संकेतस्थळावर सेंट्रल बेड रिझर्वेशन सिस्टम कार्यान्वित केली. त्याचबरोबर रुग्णालयांच्या दर्शनी भागावर बेडची माहिती लावणे बंधनकारक केले होते. ९० हून अधिक रुग्णालयांमध्ये बिल तपासणीसाठी ऑडिटरची नेमणूक केली होती. त्या माध्यमातून शहरात साडे पाच कोटींहून अधिक रक्कम वजावट करण्यात आली होती. जानेवारीमध्ये कोरोनाचा जोर ओसरला, मात्र फेब्रुवारीत अचानक सात ते आठपट वेगाने कोरोना संसर्ग वाढू लागल्याने पुन्हा सरकारी यंत्रणेचे धाबे दणाणले. रुग्णसंख्या वाढू लागल्याने पुन्हा खासगी रुग्णालयांसंदर्भात तक्रारी प्राप्त होऊ लागल्या आहेत. त्यापार्श्वभूमीवर महापालिकेच्या दर नियंत्रण समितीने निर्बंध कडक केले आहेत. शासनाने ८०-२० असा बेड रिझर्वेशन व दराचा फॉर्म्युला निश्चित केला आहे. ८० टक्के बेडवरील रुग्णांवर सरकारी तर,स२० टक्के राखीव बेडवर रुग्णालयाच्या नियमानुसार बील आकारणारले जाणार आहे.

हेही वाचा - भय इथले कधी संपणार? नाशिकमध्ये विवाहितेसह चिमुरडीवर अत्याचार; भयंकर प्रकार 

रुग्णालयाच्या दर्शनी भागावर बेड व दरफलक

महापालिकेच्या दरनियंत्रण समितीने दर्शनी भागावर रुग्णालयातील राखीव बेड, उपलब्ध बेड ८० टक्के राखीव बेडवरील सरकारी दर फलक लावण्याच्या सूचना केल्या आहेत. त्याचप्रमाणे बेडची उपलब्धता दर तासाला तपासून दर्शनी भागावर माहिती देण्याच्या सूचना केल्या आहेत अशी माहिती लेखा परिक्षक बोधिकिरण सोनकांबळे यांनी दिली.

हेही वाचा - दशक्रियाची विधी पडली महागात! वारंवार सांगूनही नियमांची एैशीतैशी; परिसरात खळबळ

असे आहेत दर

राज्य शासनाने कोविड उपचारासाठी मे २०२० मध्ये दर निश्चिती केली आहे. त्यानुसार खासगी रुग्णालयांना एका बेडसाठी चार हजार  रुपये, अति-दक्षता विभागातील बेडसाठी ७,५०० रुपये तर व्हेंटिलेटर बेडसाठी ९००० दर निश्चित केला आहे. रुग्णांसाठी विमा कंपन्यांकडून जे दर निश्चित करण्यात आले त्यापेक्षा अधिक दर आकारता येणार नाही.