खासगी लॅबकडील ३५.६४ तर शासकीयमध्ये ३२.१३ टक्के अहवाल पॉझिटिव्ह; वैद्यकीय विभागाची माहिती

नाशिक : कोरोनाचा संसर्ग वाढत असताना, वर्षभरापासून शहरात खासगी व शासकीय लॅबमध्ये स्वॅब तपासणी केली जात आहे. खासगी व शासकीय लॅबमधील तपासणी अहवालानुसार खासगी लॅबमध्ये झालेल्या चाचण्यांपैकी ३५. ६४ टक्के अहवाल पॉझिटिव्ह, तर शासकीय लॅबमधील एकूण तपासण्यांपैकी ३२.१३ टक्के अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. शासकीय लॅबपेक्षा खासगी लॅबमध्ये प्राप्त झालेले पॉझिटिव्ह अहवाल ३.५१ टक्के अधिक आहेत. 

एप्रिल २०२० मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर टप्प्याटप्प्याने कोरोनारुग्णांची संख्या वाढत गेली. आतापर्यंत शहरात एक लाख १८ हजार ८४३ कोरोनाबाधित आढळून आले. यातील एक लाख ७५८ रुग्ण बरे झाले असून, एक हजार १५८ रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत. शहरात सध्या १६ हजार ९२७ ॲक्टिव्ह कोरोनाचे रुग्ण असून, ते बरे होण्याचे प्रमाण ८४.९२ टक्के आहे. रुग्णवाढीचे प्रमाण वाढीस लागल्यानंतर खासगी व शासकीय लॅबमध्ये कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढले. वर्षभरात शहरात रुग्णवाढीचे प्रमाण वाढल्यानंतर खासगी व शासकीय लॅबमध्ये कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढले. चार लाख १६ हजार ८७२ चाचण्या झाल्या. यात एक लाख १८ हजार ८४३ पॉझिटिव्ह आढळले. एकूण पॉझिटिव्ह रुग्णांपैकी खासगी लॅबमध्ये दोन लाख सात हजार ४७१ आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. त्यातील ७३ हजार ९४३ चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असून, त्याचे प्रमाण ३५.६४ टक्के आहे. शासकीय लॅबमध्ये ६५ हजार ३८८ आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. त्यातील २१ हजारांहून अधिक रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. शासकीय लॅबमधील पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण ३२.१३ टक्के आहे. एक लाख ४४ हजार रॅपिड ॲन्टिजेन चाचण्या झाल्या. त्यात १९ हजार ८८९ अहवाल पॉझिटिव्ह आले. टक्केवारीत हे प्रमाण १३.८१ टक्के आहे. 
 

हेही वाचा - देव तारी त्याला कोण मारी! तिसऱ्या मजल्यावरून पडूनदेखील चिमुरडी सुखरूप

९० टक्के गृहविलगीकरण 

शहरात सध्या १९ हजार ९२७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. ९.७४ टक्के रुग्णांवर कोविड सेंटर, खासगी व सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. १४ हजारांहून अधिक रुग्ण गृहविलगीकरणात आहे. गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांचे प्रमाण ९०.२६ टक्के आहे. शहरात वर्षभरात २३ हजार ४०४ प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा केली होती. सध्या एक हजार ४८१ प्रतिबंधित क्षेत्रे आहेत. वैद्यकीय पथकांच्या माध्यमातून कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग केले जात असून, त्याचे प्रमाण १९.७२ टक्के आहे.  

हेही वाचा - महिलांनो सावधान! तुमच्या फेक अकाऊंटवरून पुरुषांना ब्लॅकमेलिंग; सायबर भामट्यांचा नवा प्रकार