खासदारांचा बांधावर जात शेतकऱ्यांशी संवाद; केंद्रीय अनुदान योजनांचा घेतला आढावा

सिन्नर (नाशिक) : केंद्र शासनाकडून शेती क्षेत्रासाठी राबविण्यात येणाऱ्या अनुदान योजनांचा आढावा घेण्यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी सोमवारी (ता. १) सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष बांधावर भेटी देऊन संवाद साधला. कृषी योजनांच्या लाभाविषयी शेतकऱ्यांचे मतही त्यांनी जाणून घेतले.

शेतीची पाहणी करत अडचणी विचारणा

शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून मिळणारे लाभ याबाबत माहिती घेण्यासाठी खासदार गोडसे यांचा सिन्नर आणि इगतपुरी तालुक्यांचा दौरा कृषी विभागाकडून आयोजित केला होता. या दौऱ्याची सुरवात पांढुर्ली येथून झाली. 
द्राक्ष बागायतदार रवींद्र बोऱ्हाडे यांच्या बागेसाठी प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेंतर्गत ठिबक संच अनुदान वितरित झाल्याने खासदार गोडसे यांनी या योजनेची पाहणी केली. शेतातील अत्याधुनिक स्वयंचलित ठिबक आणि खत व्यवस्थापन प्रणालीविषयी त्यांनी जाणून घेतले. महेश वाजे यांच्या शेतातील एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत अनुदानित पॉलिहाउसची या वेळी पाहणी केली. राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानाच्या कृषि यांत्रिकीकरण उपअभियानांतर्गत चंदन तुपे, लताबाई पवार, सखाराम कवटे यांना रोटाव्हेटर आणि ट्रॅक्टरसाठी अनुदान वितरित केले आहे. या यंत्रांची खासदार गोडसे यांनी पाहणी केली. केंद्राच्या व राज्य सरकारच्या कृषी अनुदान योजनांचा लाभ मिळण्यासाठी येणाऱ्या अडचणींबद्दल त्यांनी जाणून घेतले. 

हेही वाचा >> बारा दिवस झुंजूनही अखेर सलोनीला मृत्यूने गाठलेच; मामाच्या गावी भाचीचा दुर्देवी अंत

राष्ट्रीय जमीन आरोग्यपत्रिका अभियानांतर्गत शेतकऱ्यांना माती तपासणीनंतरचे अहवाल म्हणजेच जमीन आरोग्यपत्रिकेचे वितरणही केले. विभागीय कृषी सहसंचालक संजीव पडवळ यांनी जमीन आरोग्यपत्रिकेचे महत्त्व सांगितले. उपविभागीय कृषी अधिकारी संजय सूर्यवंशी, गोकुळ वाघ, वसुंधरा प्रकल्पाचे उपसंचालक राकेश वाणी, तालुका कृषी अधिकारी अण्णासाहेब गागरे, मंडळ कृषी अधिकारी महेश वेठेकर, कृषी सहाय्यक युवराज निकम, महेशकुमार गरुड, प्रदीप भोर, तालुका तंत्र व्यवस्थापक नीलेश चौधरी यांच्यासह सुकदेव वाजे, चंद्रकांत वाजे, हरिश्चंद्र भालेराव, सुरेश घोडेकर, पोपट पवार, चेतन वाजे, संतू नानेकर, सूरज वाजे, भाऊसाहेब वाजे, नंदू भोर, सतीश दळवी, पंढरी दळवी, मनोहर मोगले, संतू वाजे, शिवाजी शेळके, तुकाराम शेळके, भाऊसाहेब शेळके, संजय दळवी, भाऊसाहेब दळवी, भास्कर चंद्रे आदी शेतकरी उपस्थित होते.   

हेही वाचा >> खळबळजनक! तीन दिवसांपासून बेपत्ता तरुणाची थेट मिळाली डेड बॉडीच; कुटुंबाला घातपाताचा संशय